गुरुपुष्यामृत : चांदीच्या दुर्वा, चांदीचा मोदक आणि बरेच काही.. गणरायासाठी घ्या कमी वजनाच्या सुंदर वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 15:45 IST2025-08-19T15:37:48+5:302025-08-19T15:45:23+5:30

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोन्याचांदीच्या वस्तूंची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. आता गणेश उत्सवाच्या आधी गुरुपुष्यामृत योग आला आहे. त्यामुळे हा मुहूर्त साधून गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू तुम्ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत घेऊ शकता.
सोन्यापेक्षा चांदीची खरेदी खिशाला जरा परवडू शकते आणि नव्या खरेदीमुळे गणपती बाप्पाचे स्वागतही जोरदार होऊ शकते.. त्यामुळे पुढे सांगितलेल्या काही कमी वजनाच्या आणि कमी किमतीत येणाऱ्या चांदीच्या वस्तूंचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
गणरायासाठी चांदीचे जास्वंदाचे फुल घेण्याचा विचार नक्की करा. गणपतीला जास्वंद अतिशय प्रिय. चांदीच्या जास्वंदामध्ये कित्येक प्रकारचे वेगवेगळे आकार मिळू शकतात. शिवाय लाल, गुलाबी अशा रंगांमध्येही चांदीचे जास्वंदाचे फूल मिळते.
चांदीच्या दुर्वा हा देखील एक चांगला पर्याय आहे. आपल्या बजेटप्रमाणे आपण २१, ५१, १०१ अशा दुर्वांचा सेट घेऊ शकतो.
उंदीर हे गणपतीचे वाहन. त्याच्याशिवाय गणपती जणू काही अपूर्णच. त्यामुळे चांदीचा उंदीरही या दिवसांत सराफा दुकानात मिळतो. तो देखील तुम्हाला पाहिजे त्या आकारात आणि वजनात मिळेल.
गणपतीसाठी चांदीचा मुकूटही तुम्ही घेऊ शकता. दरवर्षी साधारण ज्या आकाराची मुर्ती घेता त्यानुसार मुकूट घ्या. हे मुकूट ॲडजेस्टेबल असतात. गणपतीच्या आकारानुसार ते वाकवून कमी जास्त करता येतात.
आपल्याला माहितीच आहे की मोदक हा गणपतीचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. त्यामुळे गणपतीला नेहमीच मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही गणरायाच्या मुर्तीजवळ ठेवायला चांदीचा मोदक घेऊ शकता. १, ११, २१ या सेटमध्येही मोदक मिळतात.