Dr. Jane Goodall : चिंपाझींवर संशोधन करणारी लोकविलक्षण संशोधक, नव्वदीत घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 16:55 IST2025-10-03T16:49:24+5:302025-10-03T16:55:13+5:30
Dr. Jane Goodall: Legendary researcher who researched chimpanzees, passed away at the age of ninety : नामवंत संशोधक डॉ. जेन यांचे वनजन्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान फार मोठे.

नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या डॉ. जेन आताआतापर्यंत प्रवास करत होत्या. मनात कायम एकच आस जन्मभर होती, माणसानं ठरवलं तर पृथ्वी वाचवू शकतो, जगवू शकतो इथलं जीवन. त्याच उमेदीनं त्यांनी जंगलांचा, चिंपाझींचा ध्यास आयुष्यभर घेतला. त्यांच्याशी दोस्ती केली.
एक महिला म्हणून त्यांना कमी का त्रास झाला, आज त्यांच्या निधनानंतर जग त्यांचं ऋण मान्य करत असलं तरी ऐन तारुण्यात जेनला छळणारे, नावं ठेवणारे, तिची वाट अडवणारे कमी नव्हते. पण तिनं एकच तत्व पाळलं आपल्या कामावर आपलं प्रेम, ते आपण नेटानं करत राहायचं.
चिंपांझींचा अभ्यास करत निसर्गाशी अतूट नातं जोडणाऱ्या एका असामान्य शास्त्रज्ञ म्हणून. त्यांचं आयुष्य कुठल्या प्रयोगशाळेत सुरू झालं नाही. ते झालं प्रत्यक्ष जंगलात. एक छोटीशी मुलगी टारझनच्या गोष्टी वाचत मोठी झाली आणि तिनं मनापासून ठरवलं मी आयुष्यभर जंगलातच काम करणार!
१९६० साली, वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी, जेनआफ्रिकेतील गोंबेच्या जंगलात पोहोचल्या. तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही डिग्री नव्हती, फक्त निरीक्षण करण्याची नजर, मनात अपापर प्रेम आणि चिकाटी होती. त्या चिंपांझींचा अभ्यास करु लागल्या. चिंपाझींचा केवळ प्राणी म्हणून नाही, तर त्यांचे स्वभाव, भावना , त्यांचं जगणं हे सारं त्यांच्या जगण्याचा भाग झालं.
चिंपाझींशी त्यांची दोस्ती, त्यांनी चिंपाझी कसे जगतात याविषयी जे जे आपल्या अभ्यासातून मांडलं ते आता पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत पथदर्शी आहे. जन्मभर त्यांनी पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी समाज यांच्यासाठी काम केलं.
Jane Goodall Institute and Roots & Shoots या संस्थेची त्यांनी स्थापना केली. त्यातून जगभरातील लाखो तरुण पर्यावरणासाठी उभे राहिले. मोठं काम होऊ लागलं.
त्या नेहमी म्हणत, प्रत्येक माणूस बदल घडवू शकतो. प्रश्न एवढाच आहे की तुमची तसा बदल घडवण्याची इच्छा आणि तयारी आहे का?