आंबे खाऊन खरंच वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने खा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 12:15 IST2025-05-15T12:05:26+5:302025-05-15T12:15:23+5:30

फळांचा राजा आंबा आवडत नसलेली व्यक्ती क्वचितच एखादी असते. बहुतांश जणांना आंबा मनापासून आवडतो. पण तरीही वजन वाढेल, शुगर वाढेल या भितीने अनेकजण आवडत असूनही आंबा खाणं टाळतात.

असंच तुम्हीही करत असाल वजन, शुगर वाढण्याच्या भितीने आंबे खाणं टाळत असाल तर आहारतज्ज्ञांचा हा सल्ला एकदा वाचायलाच हवा..

याविषयीचा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते असं सांगत आहेत की जर तुम्ही योग्य पद्धतीने आंबे खाल्ले तर वजन, शुगर मुळीच वाढत नाही. उलट तुमच्या आरोग्याला भरपूर फायदेच होतात.

पण त्यासाठी काही पथ्यं मात्र जरुर पाळायला हवीत. म्हणजेच आंब्यासोबत दूध, क्रिम, साखर असे पदार्थ खाऊ नका. ते एक फळ म्हणूनच खा.

आंब्याचा रस, मँगो शेक, मँगो मस्तानी असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खाण्यापेक्षा नुसता एक साधा आंबा खाणेच योग्य. लहान ते मध्यम आकाराचा आंबा दररोज १ याप्रमाणात तुम्ही खाल्ला तरी चालेल.

जेवण झाल्यानंतर लगेचच आंबे खाणं टाळावं. दोन जेवणांच्या मधल्या काळात आंबा खा. किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण यादरम्यान आंबा खाणे चालते.

रात्रीचं जेवण झाल्यानंतर डेझर्ट म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खाणं अनेकांना आवडतं. पण ते अतिशय चुकीचं आहे. डेझर्ट म्हणून आंब्याचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. किंवा मग अपचन, ब्लोटींग, पोट फुगणे असेही त्रास होऊ शकतात.

आंब्यामधून मॅग्नेशियम, पोटॅशियम, ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आंबे खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं.