निरोगी दीर्घायुष्यासाठी ५ सोपे नियम, आयुर्वेद सांगताे 'या' पद्धतीने दिवसभर कामं करा- आजारपणच विसरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 09:35 IST2026-03-26T09:30:17+5:302026-03-26T09:35:01+5:30

दिवसभर आपली कामं करताना खाण्यापिण्याची, व्यायामाची आणि झोपेची काही सोपी पथ्यं पाळली तर नक्कीच पुढचा दिवस अधिक चांगला जातो...

त्यासाठी आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी असावी याविषयी आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलेली माहिती dr.poorneshwar_sawant_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुमचा संपूर्ण दिवस जात असेल तर आजारपण तुमच्याकडे फिरकणारही नाही, असं डॉक्टर सांगत आहेत.

त्यानुसार सकाळी ६ ते १० हा कफाचा काळ आहे. यामध्ये पृथ्वी आणि जल तत्त्व हे खूप प्रभावी असतात. त्यामुळे या काळात शरीर शुद्ध करून घ्या. हलका आहार घ्या आणि व्यायाम नक्की करा.

सकाळी १० नंतर ते दुपारी २ पर्यंत पित्तप्रधान काळ असतो. या काळात जल व अग्नी तत्त्व हे प्रमुख असतात. सगळी महत्त्वाची किंवा मेहनतीची कामं या काळात करायला हवी. शिवाय दुपारचं जेवणही याच वेळेत व्हायला हवं.

दुपारी २ ते संध्याकाळी ६ हा वाताचा काळ आहे. या दरम्यान वायू आणि आकाश तत्व हे प्रधान असतात. म्हणूनच अशावेळी हलका आहार घ्या.

सायंकाळी ६ ते रात्री १० हा पुन्हा कफाचा काळ असतो. या काळात हलका आहार घ्या. कामाची गती हळूवार करा आणि याच काळात झोपेसाठी स्वत:ला तयार करा.

तसेच रात्री लवकर झोपल्यानंतर पहाटे लवकर उठा. प्राणायाम, ध्यानधारणा करून दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमचा पुढचा संपूर्ण दिवस आनंदी, उत्साही आणि उर्जादायी जाण्यास मदत होईल.