कैरीचे करा ५ चविष्ट पदार्थ - आमटी ते लोणचं विविध प्रकार , चव मात्र सगळ्यांची खासच !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 17:34 IST2026-04-03T17:23:45+5:302026-04-03T17:34:07+5:30

5 delicious dishes made from raw mangoes - the taste is unique, must try : कैरीच्या विविध रेसिपी करा झटपट.

मस्त आंबट गोड कैरी तिखट मीठ लावून खायला मजा काही वेगळीच येते. हीच कैरी वापरुन काही पदार्थही करता येतात. उन्हाळ्यात खास आवडीने खाल्ले जातात. आंबट-तिखट चवीमुळे हे पदार्थ खूपच चविष्ट लागतात. कैरीचे काही लोकप्रिय पदार्थ नक्की करा.

कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि उन्हाच्या झळांपासून बचाव करणारे पेय आहे. कैरी उकडून त्यात साखर, मीठ आणि जिरेपूड घालून ते तयार केले जाते. गुळाचेही करता येते. गूळ घातलेले जास्त पौष्टिक ठरते.

कैरीची चटणी ही कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि थोडी साखर घालून केली जाते. भाकरी, पोळी किंवा स्नॅक्ससोबत ती खूप छान लागते. त्यात कांदा लसूण असे इतरही पदार्थ घालता येतात.

कैरीचा भात हा दक्षिण भारतीय पद्धतीने केला जाणारा चविष्ट पदार्थ आहे. किसलेली कैरी, कढीपत्ता, मोहरी आणि मसाले घालून भात तयार केला जातो.

कैरीचे लोणचे हे फार लोकप्रिय असते. कैरीचे तुकडे करुन त्यात मीठ, लाल तिखट, मोहरी, लोणचं मसाला तेल आदी पदार्थ घालून बनवले जाते. हे दीर्घकाळ टिकते आणि जेवणाची चव वाढवते.

कैरीची डाळ ही चण्याच्या डाळीत किसलेली कैरी, मिरची आणि फोडणी घालून केली जाते. ही डिश हलकी, चविष्ट आणि पौष्टिक असते. मार्च ते मे या दरम्यान घरोघरी ही डाळ केली जाते.

कैरीची आमटी हा आंबट-गोड आणि तिखट चवीचा छान पदार्थ आहे. शिजवलेल्या कैरीमध्ये गूळ, मसाले आणि फोडणी घालून ही आमटी तयार केली जाते. भातासोबत ती विशेष चविष्ट लागते. त्यात ताजा नारळ घालून वाटण केले जाते. नक्की करुन पाहा.