हीच ती लस... देशवासीयांना प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीचे 'रिअल फोटो'

By महेश गलांडे | Published: January 7, 2021 06:57 PM2021-01-07T18:57:53+5:302021-01-07T19:06:30+5:30

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीच्या उत्पादनाची म्हणजे कोविशील्ड लसीचे फोटो समोर आले आहेत. सीरम इंस्टीट्यटमध्ये कशाप्रकारे कोविशील्ड लसीचे पॅकेजिंक होते हे तुम्हाला पाहता येणार आहे.

देशाच्या औषध नियंत्रकांनी ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर कोरोनामुळे चिंतेत पडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

देशातील नागरिकांना ही लस नेमकी कधी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता, उद्यापासून देशातील सर्वच जिल्ह्यात या कोरोना लसींचे ड्राय रन सुरु होणार आहे.

पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सेवा बजावणारे डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

साइड इफेक्टच्या भीतीमुळे अन्य काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ही लस घेण्यास डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक असली तरी जिल्ह्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी मात्र ही लस घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.

डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.

"नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं होतं. या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.

दरम्यान, कॅडीलाच्या लसीलाही तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायला परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयनं म्हटलं आहे.

तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असं व्ही.जी. सोमाणी म्हणाले.