PHOTOS : देहूत लाखो भाविकांनी केले जगद्गुरूंना अभिवादन; तीन लाख वैष्णवांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 07:17 PM2023-03-09T19:17:08+5:302023-03-09T19:29:53+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वैष्णव बांधवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात जीवाची तमा न बाळगता या सोहळ्यास हजेरी लावत येथील वैकुंठस्थान मंदिर (गोपाळपुरा) समोर व भक्तनिवासाच्या आवारात दुपारी १२ वाजता उपस्थित वैष्णवांनी मनोभावे अभिवादन करून नांदुरकीच्या झाडावर तुकाराम नामाचा गजर करीत बुक्का, पानफुल व तुळशीची उधळण केली. (सर्व फोटो- अतुल मारवाडी)

जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत येऊन दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर वारकरी भाविक रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजनासह हरिनाम संकीर्तनात दंग झालेले होते.

मंदिराच्या आवारात राम मंदिरासमोर व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता. मंदिराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती.

यावेळी काही वारकरी वासुदेवाच्या वेषात आले होते

यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी गुरुवारी पहाटेपासूनच पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारीतून सोडण्यात येत होते.

देहूत चिमुकल्या वारकऱ्यांनीही हजेरी लावली होती.

प्रसादाची सोय करताना

सकाळपासूनच इंद्रायणी नदी घाट भाविकांनी फुलून गेला होता.

वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी गोपाळपुऱ्याकडे गर्दी करीत होते आणि जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी सुरक्षित बसत होते.