वृत्तपत्र विक्रेता दिन : पहाटे हातात पेपर पडतो, त्यामागील कष्टांची कथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:29 IST2025-10-15T16:08:54+5:302025-10-15T16:29:18+5:30

त्यांचा मध्यरात्री ३ वाजता..! दिवस सुरू होतो चौकात जायचं, गाडीतून आलेले गड्ढे घ्यायचे, ते लाइनप्रमाणे मुलांमध्ये वाटायचे, स्वतःही घ्यायचे आणि पहाट थोडी कुठे उमलू लागली असतानाच गाडीवर बसून लगेचच निघायचे बरोबर ९ वाजतात लाइन संपायला. ही गोष्ट आहे वृत्तपत्र विक्रेते व त्यांची प्रत्यक्ष लाइन टाकणारी मुले यांची! सगळे शहर झोपेच्या अधिन असताना जागे राहून राबणाऱ्या त्यांच्या कष्टांची

मध्यरात्रीचे कष्ट... सकाळी उठून, सगळे आवरून, छानपैकी खुर्चीवर बसून पेपर वाचताना त्यामागे मध्यरात्रीचे असे कष्ट असतात.

पेपर तयार होताना बातमीदार, उपसंपादकांचे कष्ट वेगळेच; पण तयार झालेले पेपर तुमच्या घरापर्यंत आणून देईपर्यंत यामागे एक भलीमोठी यंत्रणा राबत असते.

विक्रेत्यांचे यश... कोणी सलग तीन पिढ्या हेच काम करणारे, तर कोणी काही वर्षांपूर्वी नव्याने आलेले व आता याच व्यवसायातून कुटुंबाची, मुलांची प्रगती साधलेले.

वृत्तपत्रांचा इतिहास दीडशे, दोनशे वर्षांचा. तर यांचा व्यवसायही तेवढाच जुना. आजमितीस पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून ३ हजार विक्रेते आहेत. प्रत्यक्ष लाइन टाकणाऱ्या मुलांची संख्या १३ हजारांपेक्षा जास्त आहे.

असे होते वितरण.. प्रेसमध्ये पेपरची एकदा छपाई झाली की, मग वितरणाचे काम सुरू होते. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर चौकांत वितरण केंद्र असते. एकट्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आता अशी २७ केंद्र आहेत.

जिल्हा - तालुका अन् गावनिहाय वेगळीच. प्रेसमधून सर्वांत आधी बाहेर पडतो ग्रामीण अंक, मग उपनगर आणि सर्वांत शेवटी शहराची आवृत्ती.अंक वितरणाचे काम १०० वाहने करतात.

अविरत कष्ट...पावसात पेपर भिजला की ग्राहक ओरडतात. त्यामुळे ते स्वतः पेक्षाही पेपर भिजू नये म्हणून जास्त काळजी घेतात. पाऊस येतोय म्हणून विक्रेता कुठे थांबलाय, असे होत नाही.

थंडीतही कानटोपी घालतो; पण पेपर वेळेवर टाकतोच. पेपर ग्राहकापर्यंत वेळेवर नेऊन देणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असते.

एखादे व्रत करावे तसे हे काम हजारो वृत्तपत्र विक्रेते गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत.

कधी पाऊस तर कधी असह्य थंडी.. अशा प्रतिकूल स्थितीतही हातात वृत्तपत्रांचा गठ्ठा घेऊन न थकता घराघरांत पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या कामाला 'लोकमत'चा सलाम..!

टॅग्स :पुणेPune