फक्त अपघात की आणखी काही? मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे ३२ तास जाम होण्याचे कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:45 IST2026-02-05T14:33:04+5:302026-02-05T14:45:09+5:30

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा आणि राज्याची जीवनवाहिनी समजला जाणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तब्बल ३२ तास बंद पडला होता.

एका अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक अखेर मध्यरात्री २ वाजता सुरळीत झाली असली, तरी या निमित्ताने सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे.

एक्स्प्रेस-वेवरील या महाभयंकर वाहतूक कोंडीमागे केवळ अपघात हेच कारण नसून प्रशासकीय अनास्था कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वीच कर्जत-शिरूर महामार्गाचा पर्याय सुचवला होता.

मात्र, हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मंत्रालयातील फाईल्समध्ये आजही धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे, माळशेज ते लोणावळा या घाटमाथ्या दरम्यान तब्बल ७० ते ८० किमी अंतरात दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही.

जेएनपीटी, मुंबई आणि एमएमआर रिजनमधून सोलापूर, अहमदनगर, हैदराबाद आणि मराठवाड्याकडे जाणारी अवजड वाहतूक पूर्णपणे याच मार्गावर अवलंबून आहे. इतर घाटमार्गांमध्ये २०-२५ किमीवर पर्यायी मार्ग असतात, मात्र येथे तशी सोय नसल्याने एक अपघातही संपूर्ण महामार्ग ठप्प करतो. त्यामुळे कर्जत-शिरूर मार्ग गरजेचा आहे.

एक्स्प्रेस-वेवर कितीही बदल केले तरी जोपर्यंत कर्जत-शिरूर महामार्ग पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर शिफारसी मागवण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बहुचर्चित मिसिंग लिंकचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

राज्यात एकीकडे समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्गाचे नियोजन सुरू असताना, अस्तित्वात असलेल्या मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी सुचवलेला कर्जत-शिरूर मार्ग सरकार का दुर्लक्षित करत आहे, असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे. जर या पर्यायी मार्गाचे काम झाले असते, तर कदाचित प्रवाशांचे हे ३२ तास कोंडीत वाया गेले नसते.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा थेट फटका मुंबई व ठाण्यातील दूध पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे परिसरात सुमारे ५० टक्के दूध पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे