अजित पवारांच्या विमान अपघाताने जुन्नरच्या आठवणी ताज्या! ६३ वर्षांपूर्वी झालेला भीषण विमान अपघात, ९४ जण होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:25 IST2026-02-25T12:20:11+5:302026-02-25T12:25:28+5:30
Junnar Nimgiri Plane Crash 1962 : १९६२ मध्ये जुन्नरच्या निमगिरी भागात झालेल्या इटालियन एअरलाईन्सच्या भीषण विमान अपघाताला 63 वर्षे पूर्ण. जाणून घ्या ९४ जणांचा बळी घेणाऱ्या या ऐतिहासिक दुर्घटनेची थरारक माहिती.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निमगिरी गाव... आज शांत वाटत असलं तरी, १९६२ सालच्या एका पावसाळी संध्याकाळच्या कटू आठवणी आजही येथील ज्येष्ठांच्या डोळ्यांत पाणी उभं करतात. जवळपास सहा दशकांपूर्वी ७ जुलै रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात ९४ निष्पाप जीवांचा बळी गेला होता. तुफानी पाऊस आणि वादळवाऱ्यात इटालियन एअरलाईन्सचे विमान जुन्नरच्या डोंगराला धडकले आणि होत्याचे नव्हते झाले.

७ जुलै १९६२ रोजी 'अलितालिया फ्लाईट ७७१' (Alitalia Flight 771) हे सिडनी ते रोम या प्रवासावर होते. बँकॉकहून मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळाकडे झेपावले होते. हे 'डग्लस डीसी-८' विमान अवघ्या ३,६०० फूट उंचीवर असताना जुन्नर जवळील निमगिरीच्या घनदाट जंगलात कोसळले.

तांत्रिक भाषेत सांगायचे तर, वैमानिकाचा मार्ग चुकला आणि विमानाने थेट डोंगराला धडक दिली. यात ८५ प्रवासी आणि ९ कर्मचारी अशा एकूण ९४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

संध्याकाळी ६.४० वाजता सांताक्रूझ विमानतळावरून विमान औरंगाबाद परिसरात असताना शेवटचा संपर्क झाला होता. यानंतर कोणता संपर्क नसल्याने विमान डोंगररांगांत किंवा मुंबईजवळच्या समुद्रात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. निमगिरीजवळ विमानाचे अवशेष सापडल्याने विमानाचा शोध लागला.

त्याकाळी निमगिरी भागात पोहोचण्यासाठी रस्ते नव्हते. जुन्नर शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या या दुर्गम भागात मदत पोहोचवणे मोठे आव्हान होते. अखेर भारतीय सैन्यदलाला पाचारण करण्यात आले. दुर्दैवाने, एकही प्रवासी जिवंत वाचला नव्हता. सैन्याने केवळ मृतदेह आणि विमानाचे अवशेष गोळा करण्याचे काम केले.

विमानाचा ऑक्सिजन सिलिंडर बनला शाळेची घंटा!
या अपघाताच्या अनेक अजब गोष्टी आजही चर्चिल्या जातात. अपघातात सापडलेला एक ऑक्सिजन सिलिंडर चक्क स्थानिक 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये शाळेची घंटा म्हणून वापरला जात आहे.

अपघातानंतर विमानातील परकीय चलन आणि मौल्यवान वस्तू वटवण्याच्या प्रयत्नात अनेकांवर पोलीस कारवाई झाल्याचेही जुने जाणकार सांगतात.

आजही पावसाळ्यात निमगिरीचे डोंगर जेव्हा धुक्यात हरवतात, तेव्हा ५७ वर्षांपूर्वीच्या त्या भीषण दुर्घटनेची सावली पुन्हा एकदा गडद होते.

















