Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 21:26 IST2025-11-01T21:17:43+5:302025-11-01T21:26:57+5:30
Ganesh Kale Pune News: पुण्यातील टोळी संघर्ष रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. गणेश काळे या ३२ वर्षीय रिक्षा चालकाची खडी मशीन चौकातून काही अंतरावर हत्या करण्यात आली. या हत्येचा घटनाक्रम समोर आला आहे.

Ganesh Kale Murder: भरदिवसा वर्दळ असलेल्या रस्त्यावर एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे हादरले. पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपावरसमोरच हत्या करण्यात आली.

गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो रिक्षा चालवायचा. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून दोघे त्याचा पाठलाग करत आले.

चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले. गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या.

गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडीमशीन चौकाकडे येत होता. पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो गडबडला. मात्र, त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला.

गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो खाल्ली पडल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

ही हत्या गँगवारमधून करण्यात आल्याची चर्चा आहे. ज्या पद्धतीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरला गेला आहे. वनराज आदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले होते.

सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नाना पेठमध्ये आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. आता गणेश काळेच्या हत्येने आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

















