भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचे राज्याच्या राजकारणावर होणार असे परिणाम, कुणाला फायदा कुणाचे नुकसान?

By बाळकृष्ण परब | Published: July 5, 2021 08:19 PM2021-07-05T20:19:47+5:302021-07-05T20:35:17+5:30

Maharashtra Politics News: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या आमदारांना तालिका अध्यक्षांशी जोरदा हुज्जत घालून धक्काबुक्कीचा प्रयत्न केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये ओबीसी आरक्षणावरून जोरदार राडा झाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या आमदारांना तालिका अध्यक्षांशी जोरदा हुज्जत घालून धक्काबुक्कीचा प्रयत्न केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच भाजपाच्या १२ आमदारांचे विधानसभेतून वर्षभरासाठी निलंबन झाल्याने त्याचे भाजपा आणि राज्याच्या राजकारणावर अनेक परिणाम होणार आहे. हे परिणाम पुढीलप्रमाणे

भाजपाचे संख्याबळ घटले: गैरवर्तनाचा आरोप ठेवत थेट १२ आमदारांचे विधानसभेतून निलंबन झाल्याने भाजपाले मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १२ ने घटून १०६ वरून ९४ वर आले आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थिर: महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांतील घडामोडींमुळे तर आता हे सरकार पडणार असे खात्रीशीररीत्या बोलले जात होते. मात्र आज झालेल्या १२ आमदारांच्या निलंबनामुळे महाविकास आघाडी सरकार पाडून नवे सरकार स्थापण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा: नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्र विधानसभेमधील अध्यक्षपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे आव्हान भाजपाने दिले होते. मात्र आता १२ आमदारांच्या निलंबनामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निलंबित आमदारांचं होणार असं नुकसान: दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांचं वैयक्तिकरीत्याही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यांना विधिमंडळाच्या आवारात वर्षभर प्रवेश करता येणार नाही. तसेच त्यांच्या आमदार म्हणून असलेल्या सुविधाही वर्षभरासाठी बंद राहतील.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न सुटेल: महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठीच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता भाजपाच्या या १२ आमदारांच्या निलंबन मागे घेण्याच्या बदल्यात राज्यपालांकडून त्या १२ आमदारांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करून घेण्याचा तडजोडीचा मार्ग ठाकरे सरकारकडे असेल.

गिरिश महाजन, संजय कुटे, अभिमन्यु पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर, बंटी भागडिया, हरिष पिंपळे, जयकुमार रावल या भाजपाच्या या १२ आमदारांचं निलंबन झालं आहे.