चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 08:38 PM2020-09-26T20:38:02+5:302020-09-26T20:40:54+5:30

राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपाचं बिनसलं आणि थेट उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पटकावलं, शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा परस्पर विरोधी आहेत, मात्र राज्याच्या विकासासाठी एकत्र आल्याचं सांगत या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना केली.

महाविकास आघाडीचं सरकार जास्त दिवस चालणार नाही, या तिन्ही पक्षात एकमत नाही, प्रत्येक मुद्द्यावरुन वेगवेगळी भूमिका असते, त्यामुळे सरकार अंतर्विरोधामुळेच पडेल, आम्ही पाडणार नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेनं भाजपासोबत घेतलेली फारकत देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली, हाती आलेलं मुख्यमंत्रिपद निसटल्याने देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले. त्यामुळे १०५ जागा असूनही राज्यात भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्ष काळात महत्त्वाची भूमिका कोणी निभावली असेल ती म्हणजे संजय राऊत..काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी, शरद पवारांशी संपर्क, उद्धव ठाकरेंचा संदेश पोहचवणं, भाजपाला उत्तर देणं ही सगळी भूमिका संजय राऊतांनी लिलया पार पाडली.

सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली अशा शब्दात भाजपा नेत्यांनी टीका केली, त्यानंतर भाजपाविरोधात संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत वातावरण निर्मिती करत होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं,

गेल्या ९ महिन्यात संजय राऊत यांनी सामनातून असो वा माध्यमातून विरोधी पक्ष भाजपावर टीका करण्याचीही एकही संधी सोडली नाही. तर सामना आम्ही वाचत नाही असं सांगत फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला.

एकंदर पाहिलं तर शिवसेना-भाजपा यांच्यातील दुरावा वाढतच चालला होता, मात्र अलीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरण, बॉलिवूड ड्रग्स या प्रकरणात भाजपाने शिवसेनेची कोंडी केल्याचं दिसलं, यातच आदित्य ठाकरे यांचे सुशांत प्रकरणात जोडल्यामुळे या वादाला आणखी जोर मिळाला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणाशी काही संबंध नाही असं पत्रक काढत विरोधकांचे आरोप फेटाळले. हे सरकार सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडणार असा दावा भाजपा नेते नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते उद्धव ठाकरे सरकारमध्ये नाराज असल्याच्या बातम्याही आल्या.

सरकारमध्ये कितीही एकमत असल्याचं दाखवण्यात येत असलं तर प्रत्यक्षात तसं दिसत नाही हे सत्य आहे. म्हणून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. उद्या भविष्यात राज्यात पुन्हा काही घडामोडी घडल्या तर चाचपणी करणं गरजेचे आहे हे सर्व पक्षांना ठाऊक आहे.

त्यातच राजकारणात काहीही होऊ शकतं, परस्परविरोधी विचारधारेचे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात तर भाजपा शिवसेना का नाही? हा प्रश्नही आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली कारण संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाल्याचं भाजपा नेत्यांनी सांगितले.