महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:43 PM2021-06-11T14:43:45+5:302021-06-11T14:53:16+5:30

Mahavikas Aghadi: राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस असली तरी हे सरकार ५ वर्ष टीकेल असा दावा शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चालवताना होणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

मंत्री चढ्या आवाजात बोलतात असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीत सगळंकाही आलबेल आहे. हे सरकार ५ वर्ष चालेल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. अलीकडेच मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते.

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारबाबत चर्चा झाली. त्यात शरद पवार यांनी पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना शिवसेना हा विश्वासदायक पक्ष आहे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो पाळल्याची आठवण करून दिली.

इतकचं नाही तर हे सरकार चालेल की नाही असं अनेक जण म्हणतात. परंतु महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल आणि आगामी २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

मात्र शरद पवारांच्या या विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. पुढील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. आमच्या मित्रपक्षाचे काय प्लॅनिंग आहे याबद्दल कल्पना नाही असं विधान त्यांनी केले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही मोदींचे कौतुक केल्यानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत. गेल्या ७ वर्षात भाजपाला राष्ट्रीय पातळीवर यश मिळालं ते मोदींमुळेच. प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं आहे. त्यांचा मुख्यमंत्री असावा असं वाटतं असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेस म्हणून आमची स्वबळाची तयारी आहे. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढू शकतं. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्यावेळी बसून निर्णय होईल. परंतु आता आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही असं नाना पटोलेंनी सांगितले आहे.

दरम्यान, राजकारणाच्या निवडणुकीत रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत भाजपा, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससाठी निवडणुकीत काम केले आहे.

प.बंगालच्या निवडणुकीनंतर त्यांनी निवडणुकीचं काम करणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत भेट ही मिशन २०२४ तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र पवार साहेब अनेकांना भेटत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते तशीच ही भेट आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केले.