जाणून घ्या! सेल्स गर्लपासून केंद्रीय अर्थमंत्री पदापर्यंत कसा होता निर्मला सीतारामन यांचा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:36 PM2020-08-18T17:36:59+5:302020-08-18T17:40:04+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना देश आणि जगाकडून अनेकांकडून शुभेच्छा मिळत आहेत. सेल्स गर्लपासून देशाची अर्थमंत्री होण्याचा त्यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायक आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी आपल्या कष्टाच्या जोरावर देशाची अर्थमंत्री कशी बनते हे अतिशय रोमांचकारी आहे. निर्मला सीतारामन या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून काम करणारी देशातील पहिली महिला आहे. याआधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे १९७०-७१ दरम्यान वित्त मंत्रालयाचा कार्यभार होता, परंतु अतिरिक्त कार्यभार म्हणून त्यांनी सांभाळलं होतं.

निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तिरुचिराप्पल्ली, तामिळनाडूमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील नारायण सीतारामन रेल्वेमध्ये काम करत होते. त्याच्या आईचे नाव सावित्री सीतारामन, गृहिणी होती. त्यांचा सुरुवातीचा अभ्यास चेन्नई आणि तिरुचिरापल्ली येथे झाला १९८० मध्ये त्यांनी तिरुचिराप्पल्लीतील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली.

यानंतर निर्मला सीतारामन दिल्लीला आल्या. १९८४ मध्ये त्यांनी जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. जेएनयूमध्ये शिकत असताना, त्यांची भेट पराकला प्रभाकर यांच्याशी झाली, ज्यांचे कुटुंबातील अनेक कॉंग्रेस नेते होते. त्यांचे पती प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्र बाबू नायडू यांचे कम्युनिकेशन सल्लागार म्हणूनही काम केले.

१९८६ मध्ये त्यांनी पराकला प्रभाकरशी लग्न केले आणि लंडनमध्ये राहायला गेले. लंडनमध्ये आल्यानंतर त्यांनी प्राइस वॉटरहाऊस येथे रिसर्च अँड अ‍ॅनालिसिसमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. पण पीडब्ल्यूसीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी लंडनमधील रीजेंट स्ट्रीटमधील होम डेकोरच्या स्टोअरमध्ये काही दिवस सेल्स गर्ल म्हणूनही काम केले.

१९९९ मध्ये त्या भारतात परतल्या. त्यांनी हैदराबादमध्ये काही काळ पब्लिक पॉलिसीमध्ये उपसंचालक म्हणून काम केले. लंडनमध्ये बीबीसी वर्ल्डमध्येही त्यांनी काम केले.

निर्मला यांचे पती प्रभाकर आणि कुटुंब कॉंग्रेसचे समर्थक असले तरी २००६ निर्मला सीतारामन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द झपाट्याने वाढली, चार वर्षातच २०१० मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी निर्मला सीतारामन यांना भाजपाचे प्रवक्ते बनवले.

या भूमिकेत निर्मला सीतारामन यांनी प्रचंड काम केले, पक्षाकडून त्यांचे कौतुकही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या या कामाचे कौतुक केले. आंध्र प्रदेशातून त्यांना राज्यसभेचे सदस्यदेखील केले गेले. स्पष्ट आणि प्रेमळपणे बोलण्याच्या त्यांच्या शैलीत त्यांचा पक्षात मान वाढला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना महत्त्वपूर्ण भूमिका दिल्या होत्या. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळालं.

मे २०१४ मध्ये निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या. २०१७ मध्ये, त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले. पूर्णवेळ संरक्षणमंत्री म्हणून काम करणारी ती देशातील पहिली महिला आहे. तत्पूर्वी इंदिरा गांधी यांनी संरक्षणमंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

सध्या निर्मला सीतारामन या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत ज्यांनी पूर्णवेळ वित्त मंत्रालय सांभाळलं आहे. यापूर्वी इंदिरा गांधींकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून हा विभाग होता. यापूर्वी निर्मला यांनी वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्रीही राहिल्या आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातही काम केले आहे.

Read in English