पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् पंकजा मुंडे यांच्या बैठकीत काय घडलं?; “तुम्ही खूप बोलता, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:24 PM2021-07-12T21:24:18+5:302021-07-12T21:29:03+5:30

Narendra Modi Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराज आहे.

केंद्रीय कॅबिनेट विस्तारानंतर महाराष्ट्रात मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं भाजपा कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. बीडमध्ये ७०, अहमदनगर २५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षात खळबळ माजली आहे.

बीड, अहमदनगरनंतर आता राजधानी मुंबईत भाजपाला पहिला धक्का बसला आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी राजीनामा दिला आहे. डमाळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईलअशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले.

तोच वारसा घेऊन पंकजाताई आणि प्रीतमताई दिवसरात्र पक्षविस्तारासाठी मेहनत घेत आहेत. या दोन्ही मुंडे भगिनींकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी चिटणीसपदाचा राजीनामा देत आहे.

डॉ. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चेने मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रीतम मुंडे यांच्या नावाला स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेगाव येथे मुंडे समर्थकांनी राजीनामा दिल्याने भाजपात खळबळ माजली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून मुंडे समर्थकांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. पाथर्डी-शेगावमधील पंचायत समितीच्या सभापती सुनील दौड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे यांच्यासह २५ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत

पक्ष नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहचवाव्यात यासाठी आम्ही राजीनामा देत आहोत असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यातच मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात राजीनामा दिलेलं पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती.

पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. झी २४ तासने ही बातमी दिली आहे.

तसेच बीड जिल्ह्यातील एका मुस्लीम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय, त्यांना केंद्राने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या पद्मश्रींना तुम्ही जाऊन भेटला का? असा सवाल पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. लोकांशी नाळ तोडू नका असा सल्ला त्यांनी पंकजा यांना दिला.