Tokyo Olympics 2020: डबल ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आहे इतक्या कोटींची मालकीण, आठवड्याला कमावते लाखभर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:09 PM2021-08-03T19:09:39+5:302021-08-03T19:12:55+5:30

भारताच्या पी व्ही सिंधून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली, यापूर्वी तिनं रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू आहे. Know about bronze medal winner PV Sindhu net worth

क्रिकेटप्रेमी भारतात क्रिकेटपटूंचीच चांदी आहे... पण मागील काही वर्षांत क्रिकेट सोडून अन्य खेळांतील खेळाडूंकडे मोठ मोठे ब्रँड्स जाहीरातीसाठी वळू लागले आहेत. अन्य खेळाडूंनाही मोठ मोठ्या कंपन्यांनी करारबद्ध केले आहे. त्यापैकी एक म्हणजे बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू... ( PV Sindhu)

अन्य खेळांतील खेळाडूंमध्ये सध्याच्या घडीला पी व्ही सिंधू ही सर्वाधिक कमाई करणारी भारतीय खेळाडू आहे, असा दावा केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. तिच्याकडे आज अनेक जाहीराती आहेत आणि त्यात आता तिनं पुन्हा ऑलिम्पिक पदक जिंकल्यानं हा ओघ आणखी वाढणार, यात शंकाच नाही.

भारताच्या पी व्ही सिंधून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली, यापूर्वी तिनं रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू आहे.

आता कोरोनाचं संकट हळुहळू कमी होताना दिसताना बाजारातही तेजी आली आहे आणि अशात आता सिंधूसोबत करार करण्यासाठी अनेक नामवंत कंपन्या शर्यतीत दिसतील. त्यामुळे सिंधूच्या कमाईतही घसघशीत वाढ झालेली पाहायला मिळेल, हे नक्की.

मागील वर्षी सिंधूचे नेटवर्थ ( एकूण मालमत्ता) ही ७२ कोटी एवढी होती. २०१८ व २०१९मध्ये फोर्ब्सनं जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये पी व्ही सिंधूनं स्थान पटकावलं होतं.

२०१८मध्ये तिचं नेटवर्थ ६० कोटी होतं, तर २०१९मध्ये ४० कोटी होतं. या एका वर्षांत तिचं नेटवर्थ कमी झाले असले तरी २०२०मध्ये तिनं मोठी झेप घेतली आहे.

२०१९मध्ये सिंधुनं चीनच्या लि निंग या ब्रँडसोबत चार वर्षांसाठी ५० कोटींचा करार केला. बॅडमिंटन खेळातील हा सर्वात महागडा वैयक्तिक करार आहे. यातील ४० कोटी हे प्रायोजक म्हणून आहेत, तर १० कोटी हे उपकरणांसाठी आहे.

यापूर्वी सिंधूनं २०१६ ते २०१८ या कालावधीत ३५ कोटींचे करार साईन केले होते. आता सिंधून कांस्यपदक जिंकल्यानंतर तिच्या करार रकमेत वाढ होणे साहजिक आहे.

सध्याच्या घडीला सिंधूकडे १३ हून अधिक मोठे व नामांकित ब्रँड्स आहेत, ज्यांच्यासाठी ती जाहीरात करते. सिंधू जेबीएल, ब्रिजस्टोन, टायर्स, बँक ऑफ इंडिया, गैटोरेड, मुव्ह, मिंत्रा, फ्लिपकार्ट, नोकिया, पॅनासॉनिक, स्टे फ्री आदी ब्रँड्सचा समावेश आहे.

पी व्ही सिंधू प्रती जाहीरातीसाठी वर्षाला १ ते दीड कोटी रुपये घेते. यानुसार सिंधूच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज बांधता येईल. paycheck.in नुसार पी व्ही आठवड्याला लाख रुपये कमावते. सिंधूची वार्षिक कमाई ही ४१ कोटींच्या घरात आहे.