१०० कोटींची ऑफर, आमदार खरेदीच्या आरोपात अडकणार भाजपाचा 'हा' मोठा नेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:43 PM2022-11-19T15:43:10+5:302022-11-19T15:45:29+5:30

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बीएल संतोष यांना तेलंगणा पोलिसांच्या एसआयटीने समन्स बजावले आहे. २१ नोव्हेंबर रोजी संतोष यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे बी. एल. संतोष यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.

याप्रकरणी तेलंगणा पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. आतापर्यंत चार राज्यांतील सात ठिकाणांहून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणातील सत्ताधारी टीआरएसचे आमदार पी रोहित रेड्डी यांनी भाजपा नेत्यांविरोधात घोडेबाजाराचा आरोप करत केला त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रेड्डी यांच्या तक्रारीच्या आधारे, रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा, नंद कुमार आणि सिंहाजी स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट, लाच देणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या तरतुदींनुसार २६ ऑक्टोबरच्या रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.

रोहित रेड्डी यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपीने त्यांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिली. त्या बदल्यात त्यांनी टीआरएस सोडून भाजपमध्ये यावे लागेल, अशी अट घातली. भाजपाच्या या ऑफरवरून रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

१ फेब्रुवारी १९६७ रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे जन्मलेले बीएल संतोष हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) आहेत. बी.एल.संतोष यांना संघटना मजबूत करण्याचा मोठा अनुभव आहे. संतोष यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

१९९३ पासून त्यांनी पूर्णवेळ RSS प्रचारक म्हणून काम करायला सुरुवात केली. २००६ मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले आणि कर्नाटक भाजपचे सरचिटणीस बनले. २०१४ पर्यंत त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. दरम्यान, २००८ मध्ये कर्नाटकातही भाजपचे सरकार स्थापन झाले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा भाजपचे अध्यक्ष बनले तेव्हा बीएल संतोष यांना संयुक्त राष्ट्रीय महासचिव (संघटन) म्हणून जबाबदारी देण्यात आली. २०१९ मध्ये संतोष यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव (संघटन) ची संपूर्ण जबाबदारी आली.

टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी, बी हर्षवर्धन रेड्डी, रेगा कांथा राव आणि गुव्वाला बलराजू यांनीही अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन आल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. फोनवर त्यांना टीआरएस सोडून भाजपामध्ये येण्यास सांगण्यात आले. पैशाचे आमिषही दिल्याचा आरोप आहे.

आमदारांच्या तक्रारीनंतर रायदुर्गम, बंजारा हिल्स, घाटकेसर आणि गचीबोवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणा सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

एसआयटीने याआधीच नामांकित आरोपींना अटक केली होती, आता भाजपाच्या अन्य नेत्यांवरही कडक कारवाई केली जात आहे. याप्रकरणी एसआयटीने बीएल संतोष यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यामुळे मोदी-शाह यांचे विश्वासू असलेले बीएल संतोष यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

टॅग्स :भाजपाBJP