संयुक्त राष्ट्रात भारतावर आरोप करणारी, भगवे कपडे, रुद्राक्षमाळ घातलेली 'ही' महिला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:24 AM2023-03-01T11:24:01+5:302023-03-01T11:32:07+5:30

भारतातील साध्वीप्रमाणे पोशाख. डोक्यावर केसांची जटा, कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्षाची मोठी माळ आणि भगवी वस्त्रे. संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा कार्यालयात जेव्हा इंग्रजीत भाषण देणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती कुठल्या देशाचं प्रतिनिधित्व करतेय हे सुरुवातीला कळत नाही.

परंतु जेव्हा नित्यानंदच्या ट्विटरवरून या महिलेचा फोटो आणि व्हिडिओ टाकला तेव्हा सर्वकाही स्पष्ट झाले. भारतात बलात्काराच्या आरोपाचा सामना करणाऱ्या आणि देशातून पळालेल्या नित्यानंदने जगासमोर नवा प्रपोगेंडा पसरवला आहे.

नित्यानंदने कथित यूनाइटेड स्टेट ऑफ कैलासा नावाचा देश बनवल्याचा दावा केला आहे. ज्याठिकाणी हिंदू मान्यतेनुसार जीवन जगलं जाते. आता नित्यानंदने या काल्पनिक देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका महिलेला संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाठवण्याचा दावा केला आहे.

नित्यानंदने त्यांच्या सर्व अकाऊंटवरून याचा प्रचार सुरू केला आहे. कैलासाकडून एक महिला साध्वी जिनिव्हा इथं झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या बैठकीवेळी भाग घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या महिलेचं नाव विजयप्रिया नित्यानंद सांगितले जात आहे. कैलासाच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून विजयप्रिया नित्यानंद या संयुक्त राष्ट्रच्या बैठकीत कैलासा देशाची राजदूत म्हणून सहभागी झाली आहे. अमेरिकेच्या वॉश्गिंटन डीसी शहरात तिचं घर आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात विजयप्रिया नित्यानंद यांच्याशिवाय काल्पनिक देश कैलासातील आणखी ५ महिलांनी भाग घेतला. संयुक्त राष्ट्र संघाने जिनिव्हा येथे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील १९ वी परिषद आयोजित केली होती.

या बैठकीत कैलासातील विजयप्रिया नित्यानंद यांच्यासह कैलासा लॉस एंजेलिसचे प्रमुख डॉ. मुक्तिका आनंद, कैलासा सैंट लुईस मुख्य सोना कामत, कैलासा यूके प्रमुख नित्या आत्मदायकी, कैलासा फ्रान्स चीफ नित्या व्यकटेंशनंदा आणि कैलासा स्लोवेनी प्रियमपरा नित्यानंद सहभागी होत्या.

या अधिवेशनात माँ विजयप्रिया नित्यानंद यांनी दावा केला की, हिंदू परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतात आमचे सर्वोच्च गुरूंचा छळ केला आहे. नित्यानंद आणि कैलासातील २० लाख हिंदू स्थलांतरित लोकांचा छळ रोखण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात असं विजयप्रिया यांनी संयुक्त राष्ट्राला विचारले.

नित्यानंद यांच्यावर भारतात बलात्कारासह अनेक खटले सुरू आहेत. भारतातील न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याऐवजी नित्यानंद देशातून पळून गेले आहेत. विजयप्रिया यांनी नित्यानंद यांच्यावर केलेले छळाचे आरोप निराधार आहेत असं म्हटलं.

नित्यानंदच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विजयप्रिया नित्यानंद यांनी भारतातून फरार असलेल्या नित्यानंदचे गुरू म्हणून वर्णन केलंय. नमस्काराऐवजी नित्यानंदम असे संबोधणाऱ्या विजयप्रियाने तिच्या गुरूंनी तिच्यासाठी खूप काही केले असल्याचं म्हटलं. गुरू आणि कैलास यांना कधीही सोडणार नाही असं विजयप्रियाने सांगितले.