सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:54 IST2025-10-06T18:35:07+5:302025-10-06T18:54:44+5:30
BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर फूट फेकण्याचा प्रयत्न झाला. एका वकिलानेच हा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अचानक एक वकील न्यायमूर्ती बसतात, त्या डायससमोर आला आणि फेकून मारण्यासाठी बूट काढायला खाली वाकला. पण, लगेच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि पुढील अनर्थ टळला.
या वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी त्याला वकिली करण्यापासून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. बार काऊंन्सिल ऑफ इंडियाने ही कारवाई केली आहे.
खजुराहो येथे भगवान विष्णूची ७ फूट उंच कोरीव मूर्ती आहे. या मूर्तीचा चेहरा नष्ट झाला आहे. तो पुन्हा व्यवस्थित करण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती सरन्यायाधीशांनी फेटाळून लावली होती.
ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश म्हणाले होते की, 'जा आणि देवालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. जा आणि प्रार्थना करा. हे एक पुरातन स्थळ आहे आणि भारतीय सर्वेक्षण विभागाची परवानगीही त्यासाठी लागते."
सरन्यायाधीशांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली तर काहींनी संताप व्यक्त केला. याबद्दल कळताच सरन्यायाधीश गवई म्हणाले होते की, मी सर्व धर्मांचा आदर करतो. हे सोशल मीडियावर घडत आहे'
सोमवारी (६ ऑक्टोबर) सुनावणी राकेश किशोर या वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला सुरक्षा रक्षक घेऊन गेले. घेऊन जात असताना त्याने घोषणा दिल्या की, 'सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही.'