कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:50 IST2025-08-12T18:45:07+5:302025-08-12T18:50:22+5:30

मागील काही दिवसांपासून दहशतवादाविरोधात भारताने मोठी कामगिरी केली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवसारख्या कारवाई करत सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने सैन्याचे दहशतवाद विरोधी ऑपरेशन सुरू आहे.
एकीकडे दहशतवादाविरोधात ही लढाई सुरू असताना सुरक्षा यंत्रणेसमोर नवं आव्हान निर्माण झाले आहे. हे आव्हान म्हणजे बेडरूम जिहादी...बेडरूम जिहादी हे असे लोक आहेत जे घरातून बाहेर न पडताही दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र रचतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवतात आणि लोकांची माथी भडकवण्याचं काम करत राहतात असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
अलीकडेच एका तपासात पाकिस्तानी दहशतवादी समुहाशी निगडीत मोठ्या सोशल मिडिया नेटवर्कची माहिती उघड झाली आहे. हे सोशल मिडिया हँडल्स पाकिस्तानी दहशतवादी गट आणि त्यांच्याशी निगडीत काही लोक चालवतात. हे नेटवर्क भारतात डिजिटल क्षेत्रात घुसखोरी करत आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यात धार्मिक हिंसाचार घडवणे, तरुणांमध्ये दिशाभूल करणारे मेसेज पसरवणे आणि द्वेषाचे राजकारण करून दंगली पेटवणे यासारख्या चिथावणीखोर गोष्टींचा प्रचार करण्याचं काम पाकिस्तानी सोशल मिडिया नेटवर्कच्या माध्यमातून केले जात आहे.
शत्रू पारंपारिकपणे दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांनी लढण्याऐवजी जम्मू काश्मीरच्या भागात अशांतता पसरवण्यासाठी सीमापार नेटवर्क चालवतात. दहशतवाद्यांशी लढण्याव्यतिरिक्त सुरक्षा यंत्रणा या लपलेल्या शत्रूचा सामना करत आहेत.
जिहादींची नवीन पिढी कुठेही बसून संगणक आणि स्मार्टफोन वापरून युद्ध करण्याचा आणि तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दहशतवाद्यांचा हा कट पहिल्यांदा २०१७ मध्ये उघड झाला होता, परंतु २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर तो काही प्रमाणात थांबला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बेडरूम जिहादी पुन्हा समोर आले आहेत असं अधिकारी सांगतात.
गेल्या काही आठवड्यांपासून या संदर्भात चौकशी सुरू होती ज्यामध्ये हजारो सोशल मीडिया पोस्ट, विधाने आणि वैयक्तिक संदेश तपासण्यात आले. या विश्लेषणातून पाकिस्तानशी जोडलेल्या गट आणि हँडलर्समधील थेट संबंध उघड झाला असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी या लोकांची ओळख पटवण्यासाठी "बेडरूम जिहादी" हा शब्दप्रयोग केला आहे. हे लोक आभासी युद्ध मैदानात उतरतात जिथे युद्ध शस्त्रांऐवजी शब्दांनी लढले जाते. ते तरुणांच्या मनावर प्रभाव पाडतात आणि अफवा पसरवण्यात त्यांची सर्व शक्ती लावतात.
कोणीही त्याच्या बेडवर किंवा सोफ्यावर बसून हजारो चॅट ग्रुपपैकी एका ग्रुपमध्ये बनावट बातम्या चालवू शकतो आणि संपूर्ण प्रदेशात दंगली भडकावू शकतो. सांप्रदायिक फूट पाडली जाऊ शकते असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.