घरे, दागिने, पीपीएफ, गाड्या अन्... सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किती श्रीमंत असतात? समोर आली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:03 IST2025-05-06T11:34:44+5:302025-05-06T12:03:29+5:30

न्यायव्यवस्थेवरील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संपत्तीची घोषणा सार्वजनिक होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २० हून अधिक न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक केली आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या मालमत्तेची माहितीही समोर आली आहे. त्यांच्या मालमत्तेत ५५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आणि १ कोटी रुपयांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाचे पुढील सरन्यायाधीश म्हणजेच मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचेही नाव समाविष्ट आहे. महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत त्यांचे अनेक फ्लॅट आहेत. याशिवाय बँकेत लाखो रुपये आहेत. भूषण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.

न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या बँक खात्यात १९.६३ लाख रुपये आणि पीपीएफ खात्यात ६.५९ लाख रुपये आहेत. गुरुग्राममधील चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये त्यांचा ५६ टक्के वाटा आहे. उर्वरित ४४ टक्के हिस्सा त्यांच्या मुलीकडे आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशातील फाळणीपूर्वीच्या वडिलोपार्जित घरातही त्यांचा वाटा आहे.

न्यायमूर्ती ओका हे २४ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या मालमत्तेत पीपीएफमध्ये ९२.३५ लाख रुपये, एफडीमध्ये २१.७६ लाख रुपये, २०२२ मॉडेलची मारुती बलेनो कार आणि ५.१ लाख रुपयांचे कार कर्ज समाविष्ट आहे.

तर न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी नोएडामध्ये २ बीएचके अपार्टमेंट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये वारसाहक्काने मिळालेली शेतीची जमीन असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय त्यांची १.५ कोटी रुपयांची गुंतवणूक देखील आहे.

वेबसाइटनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे चंदीगड, गुरुग्राम आणि दिल्ली येथे त्यांच्या पत्नीसह संयुक्तपणे निवासी मालमत्ता आहेत. त्याच्या गुंतवणुकीत ३१ एफडी आहेत. यामध्ये व्याजाचाही समावेश आहे. त्याची एकूण किंमत ६.०३ कोटी रुपये आहे.

न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांचे अहमदाबादमधील गुलबाई टेकरा इथल्या दीप्ती बँक ऑफ इंडिया सोसायटीमध्ये एक घर आहे. तसेच अहमदाबाद येथील नितीबाग जजेस कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्येही एक घर आहे. त्यांच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये ६० लाख रुपये, पीपीएफमध्ये २० लाख रुपये, ५० लाख रुपयांचे दागिने आणि २०१५ मॉडेलची मारुती स्विफ्ट कार आहे.