जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:20 IST2025-12-16T13:12:56+5:302025-12-16T13:20:21+5:30

1971 War, Pakistan Surrender report: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव का झाला? हमुदूर रहमान आयोगाच्या अहवालातील धक्कादायक खुलासे. मदिरा आणि महिलांच्या नादात ९३,००० सैनिकांनी पत्करली शरणागती.

१६ डिसेंबर १९७१ हा दिवस जागतिक इतिहासात भारताच्या शौर्याचा आणि पाकिस्तानच्या नामुष्कीचा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी बांगलादेशची निर्मिती झाली आणि पाकिस्तानी लष्कराच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली.

मात्र, या प्रचंड पराभवाचे नेमके कारण काय होते? यावर पाकिस्तानने स्वतः नेमलेल्या 'हमुदूर रहमान आयोगा'ने जे निष्कर्ष काढले, ते अत्यंत धक्कादायक आहेत आणि पाकिस्तानसाठी लाजीरवाणे देखील आहेत.

या अहवालानुसार, पाकिस्तानच्या पराभवाचे मुख्य कारण केवळ लष्करी धोरणे नव्हती, तर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचे 'मदिरा, महिला आणि विलासी जीवन' हे होते.

आयोगाने नमूद केले की, पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) तैनात असलेले वरिष्ठ लष्करी अधिकारी युद्ध करण्याऐवजी मद्यपान आणि अनैतिक कृत्यांमध्ये मग्न होते.

जनरल याह्या खान आणि जनरल ए.ए.के. नियाझी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या 'विलासी' प्रवृत्तीमुळे लष्कराची शिस्त पूर्णपणे कोलमडली होती.

लष्कराने रणांगणावर लढण्याऐवजी पूर्व पाकिस्तानातील सामान्य नागरिक आणि महिलांवर अत्याचार करण्यात धन्यता मानली, ज्यामुळे स्थानिक जनतेचा रोष ओढवून घेतला.

अनेक लष्करी अधिकारी तस्करी आणि भ्रष्ट मार्गांनी पैसे कमवण्यात गुंतले होते, ज्याचा परिणाम युद्धाच्या तयारीवर झाला होता. शरणागतीच्या आदल्या रात्री रावळपिंडीमध्ये मस्त पार्टी सुरु होती.

शरणागतीच्या दिवशी ढाक्यामध्ये उन पडले होते, तर रावळपिंडीमध्ये जनरल याह्या खान हँगओव्हरने त्रस्त होते. त्यांची जवळची सहकारी जनरल राणी काही तासांपूर्वीच त्यांचे घर सोडून गेली होती. नंतर साक्षीदारांनी सांगितले की रात्री पार्टी खूप जोरदारपणे रंगली होती.

न्यायमूर्ती हमुदूर रहमान यांच्या नेतृत्वाखालील या आयोगाने असा ठपका ठेवला की, लष्करी नेतृत्वाच्या चारित्र्यहीन वागण्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या शरणागतीपैकी एक घटना घडली. पाकिस्तान सरकारने हा अहवाल अनेक वर्षे दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर तो सार्वजनिक झाला आणि पाकिस्तानी लष्कराचे खरे स्वरूप जगासमोर आले.