'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:02 IST2026-01-13T14:55:29+5:302026-01-13T15:02:35+5:30
Vande Bharat Sleeper Ticket Price: देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर ₹९६० पासून सुरू. RAC आणि वेटिंग लिस्ट बंद. जाणून घ्या या हाय-टेक ट्रेनची वैशिष्ट्ये आणि मार्ग.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावणार असून रेल्वे बोर्डाने या ट्रेनचे तिकीट दर आणि प्रवासाचे नवीन नियम जाहीर केले आहेत. ही ट्रेन प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या आणि रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून, ती पारंपारिक राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही वेगवान आणि आरामदायी असेल.

वंदे भारत स्लीपरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीट असणार नाही. प्रवाशांना केवळ 'कन्फर्म' तिकीटच दिले जाईल. म्हणजेच, आता एका बर्थवर दोन प्रवाशांना बसून प्रवास करावा लागणार नाही. प्रवाशांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी रेल्वेने हा मोठा बदल केला आहे.

वंदे भारत स्लीपरमध्ये प्रवाशांना 'एअरलाईन्स'सारख्या सुविधा मिळणार आहेत. यामध्ये १८० किमी प्रतितास वेगाची क्षमता, स्वयंचलित दरवाजे, आधुनिक बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, कवच सुरक्षा प्रणाली आणि प्रवाशांसाठी विशेष वाचन दिवे व चार्जिंग पॉईंट्स असतील.

हावडा (कोलकाता) ते कामाख्या (गुवाहाटी) - हे अंतर साधारण ९५८ किमी असून या प्रवासासाठी ३ एसीचे भाडे सुमारे २,३०० रुपये (जेवणासह) असेल.

तिकीट दर किती असतील?
रेल्वेने या ट्रेनसाठी किमान ४०० किमी अंतराचे भाडे निश्चित केले आहे. या ट्रेनचे तिकीट दर अंतरावर आधारित असून ते खालीलप्रमाणे असतील (GST स्वतंत्र) असणार आहे.

१. वंदे भारत स्लीपरमध्ये ४०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, थर्ड एसीचे भाडे ₹९६०, सेकंड एसीचे भाडे ₹१२४० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹१५२० असेल.

२. त्याचप्रमाणे, ८०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹१९२०, २एसीचे भाडे ₹२४८० आणि १एसीचे भाडे ₹३०४० असेल.

३. १६०० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹३८४०, २एसीचे भाडे ₹४९६० आणि १एसीचे भाडे ₹६०८० असेल.

४. २००० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹४८००, २एसीचे भाडे ₹६२०० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹७६०० असेल.

५. त्याचप्रमाणे, २८०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹६७२०, २एसीचे भाडे ₹८६८० आणि पहिल्या एसीचे भाडे १०६४० असेल.

६. ३५०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹८४००, दुसऱ्या एसीचे भाडे ₹१०८५० आणि पहिल्या एसीचे भाडे ₹१३३०० असेल.

















