मेट्रोच्या डब्यापेक्षाही स्वस्त! वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एका कोचची किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:53 IST2026-01-04T12:44:58+5:302026-01-04T12:53:31+5:30

Vande Bharat Sleeper Coach Cost: भारतीय रेल्वेची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार! एका कोचची किंमत, वेग आणि प्रवाशांसाठी असलेल्या हाय-टेक सुविधांची सविस्तर माहिती वाचा.

भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्यासाठी सज्ज झाली आहे. बहुप्रतिक्षित 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन लवकरच धावणार असून, या ट्रेनच्या एका कोचची (डब्याची) किंमत समोर आली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेमी-हाय-स्पीड स्लीपर ट्रेनची निर्मिती मेट्रो कोचच्या तुलनेत स्वस्त दरात करण्यात आली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एका कोचची किंमत सुमारे ८ ते ८.५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मेट्रो रेल्वेच्या एका कोचची किंमत १० ते १०.५ कोटींच्या घरात असते.

म्हणजेच मेट्रोच्या तुलनेत ही ट्रेन रेल्वेसाठी किफायतशीर ठरत आहे. ही ट्रेन प्रामुख्याने सरकारी कंपनी BEML ने विकसित केली असून, यासाठी आयसीएफ (ICF) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

ट्रेनची रचना आणि सुविधा: या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील. प्रवाशांच्या सोयीनुसार त्याचे विभाजन खालीलप्रमाणे असेल: ११ एसी ३-टियर कोच, ४ एसी २-टियर कोच, १ फर्स्ट एसी कोच.

या ट्रेनमधून एकावेळी सुमारे ८२३ प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवाशांना आराम मिळावा यासाठी बर्थमध्ये दर्जेदार कुशनिंग, ऑटोमॅटिक दरवाजे, आधुनिक सस्पेंशन सिस्टीम आणि कमीत कमी आवाज येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या ट्रेनचा डिझाईन वेग ताशी १८० किमी इतका आहे, मात्र सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या ट्रॅकच्या क्षमतेनुसार ती सरासरी ६६ किमी प्रति तास वेगाने धावेल.

सुरक्षेसाठी यात 'कवच' (Kavach) यंत्रणा आणि प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत ड्रायव्हरशी संवाद साधण्यासाठी 'टॉक-बॅक' सिस्टीम देण्यात आली आहे.

वंदे भारत स्लीपरची पहिली ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते आसाममधील गुवाहाटी दरम्यान धावण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या ट्रेनचे उद्घाटन होऊ शकते.