ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:41 IST
1 / 8गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट असून, पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. तसेच लष्करी पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या कब्जातून सोडवून घेण्याची मागणी केली जात आहे. 2 / 8भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे या खिंडीचं असलेलं भूराजकीय महत्त्व. या खिंडीवर आज भारताचा कब्जा असता तर पाकिस्तानला काश्मीर खोरं आणि भारतात दहशतवादी कारवाया करणं तितकसं सोपं गेलं नसतं. या पार्श्वभूमीवर आज आपण हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेत असलेल्या या हाजीपीर खिंडीचं रणनीतिक महत्त्व जाणून घेऊयात. 3 / 8खरंतर काश्मीरचं विलिनीकरण झालं तेव्हाच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमक करत येथील मोठा भूभाग बळकावला होता. त्यातील बऱ्याचशा भागातून भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्लेखोरांना हुसकावले होते. मात्र त्यावेळी हाजीपीर खिंड पाकिस्तानच्या ताब्यात रहिली होती. 4 / 8 १९६५ च्या युद्धावेळी भारतील लष्कराने पराक्रमाची शर्थ करत पाकव्याप्त काश्मीरमधील मोठा भूभाग हस्तगत केला होता. त्यामध्ये हाजीपीर खिंडीचाही समावेश होता. मात्र युद्ध संपल्यानंतर झालेल्या ताश्कंद करारावेळी भारताने या खिंडीचा ताबा पुन्हा पाकिस्तानकडे दिला होता. 5 / 8हाजीपीर खिंड हे काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. हाजीपीर खिंड समुद्र सपाटीपासून ८ हजार ६६२ फूट उंचीवर आहे. या उंचीवर कब्जा असल्याने त्याचा पाकिस्तानकडून रणनीतिक फायदा सातत्याने घेतला जातो. हाजीपीर खिंडा असं ठिकाण आहे जिथून काश्मीरमधील श्रीनगर ते जम्मूमधील पुंछ हे अंतर केवळ ५५ किमी आहे. 6 / 8मात्र सद्यस्थितीत हाजीपीर खिंड पाकिस्तानच्या कब्ज्यात असल्याने पुंछहून श्रीनगरला जाण्यासाठी जम्मूहून जावं लागतं. त्यामुळे हे अंतर वाढून ६०० किमी एवढं होतं. हाजीपीर खिंड ही नियंत्रण रेषेपासून केवळ ८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे याचा गैरफायदा घेत येथून पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. 7 / 8दरम्यान, देशाची फाळणी होण्यापूर्वी उत्तर काश्मीर म्हणजे जम्मूला दक्षिण काश्मीरशी जोडणारा मुख्य रस्ता हाजी पीर खिंडीमधून जात होता. जर ही खिंड भारताच्या ताब्यात असती तर भारताला लष्कर आणि साधनसामुग्री श्रीनगरमध्ये पोहोचवणे सहज शक्य झाले असते. तसेच दहशतवाद्यांवरही लगाम लावता आला असता. 8 / 8दरम्यान, १९६५ च्या युद्धात हाजीपीर खिंड जिंकून पाकिस्तानला परत देण्याचा निर्णय भारतासाठी अजूनही महागात पडत आहे. हाजीपीर खिंडीचा उपयोग पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहेत. मात्र आता १९६५ च्या युद्धाच्या तुलनेत परिस्थिती खूप बदलली आहे. तसेच आता पुन्हा कब्जा करणं भारतासाठीही तितकसं सोपं राहिलेलं नाही. मात्र तरीही पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची चर्चा सुरू झाल्याने हाजीपीर खिंडही चर्चेत आली आहे.