हे आहेत सतराव्या लोकसभेत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवणारे टॉप-10 खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:40 PM2019-05-27T17:40:18+5:302019-05-27T18:16:52+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. त्यातही भाजपा आणि भाजपा उमेदवारांना मिळालेलेे मोठे मताधिक्य हे निकालानंतर चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-10 उमेदवारांमध्ये भाजपाचाच दबदबा राहिला. उल्लेखनीय म्हणजे यातील पहिल्या चार उमेदवारांना सहा लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले. यावेळच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांचा घेतलेला हा आढावा.

गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सी. आर. पाटील तब्बल 6 लाख 89 हजार 668 मतांनी विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला मिळालेले हे सर्वाधिक मताधिक्य ठरले. त्यांनी काँग्रेसच्या धर्मेश पटेल यांचा पराभव केला.

भाजपाचे करनाल लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय भाटिया यांनी 70 टक्क्यांहून अधिक मते घेत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप शर्मा यांचा 6 लाख 56 हजार 142 मतांनी पराभव केला.

भाजपा उमेदवार कृष्णपाल गुर्जर यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अवतार भडाना यांच्यावर 6 लाख 38 हजार 239 मतांनी मात केली.

राजस्थानमधील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुभाष चंद्रा यांनी काँग्रेसच्या रामपाल शर्मा यांचा 6 लाख 12 हजार मतांनी पराभव केला.

गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार रंजनबेन भट यांनीही पाच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. रंजनबेन यांनी काँग्रेसच्या प्रशांत पटेल यांचा 5 लाख 89 हजार मतांनी पराभव केला.

भाजपाचे दिल्लीतील नेते प्रवेश वर्मा यांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी महाबल मिश्रा यांचा पाच लाख 78 हजार 486 मतांनी पराभव केला.

राजस्थानमधील चित्तोडगड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सी. पी. जोशी यांनी पाच लाख 76 हजार 247 मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या गोपाल सिंह शेखावत यांच्यावर मात केली.

मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांचाही समावेश आहे. त्यांनी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सी.जी. चावडा यांच्यावर पाच लाख 57 हजार 14 मतांनी मात केली.

प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांनीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत मताधिक्याने विजय मिळवला. उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात हंस यांनी आपच्या गुगन सिंह यांच्यावर 5 लाख 53 हजार 897 मतांनी मात केली.

भाजपा नेते उदयप्रताप सिंह यांनी मध्य प्रदेशमधील होशंगाबाद मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या शैलेंद्र दिवाण यांच्यावर 5 लाख 53 हजार 682 मतांनी मात केली.