ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:54 IST2025-08-19T11:46:44+5:302025-08-19T11:54:08+5:30

India's Semiconductors Programme: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनी देशवासियांना संबोधित करताना यावर्षाच्या अखेरीपर्यंत भारत आपली पहिली सेमीकंडक्टर चिप विकसित करेल असं विधान केलं होतं. त्यामुळे अनेक चढउतार पाहिल्यानंतर आता भारताचं सेमीकंडक्टर चिप बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भारत सुमारे ३५ वर्षांपूर्वीच सेमीकंडक्टर चिप बनवण्याच्या जवळ पोहोचला होता. मात्र एका अनाकलनीय घटनेमुळे तेव्हा भारताचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनी देशवासियांना संबोधित करताना यावर्षाच्या अखेरीपर्यंत भारत आपली पहिली सेमीकंडक्टर चिप विकसित करेल असं विधान केलं होतं. त्यामुळे अनेक चढउतार पाहिल्यानंतर आता भारताचं सेमीकंडक्टर चिप बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भारत सुमारे ३५ वर्षांपूर्वीच सेमीकंडक्टर चिप बनवण्याच्या जवळ पोहोचला होता. मात्र एका अनाकलनीय घटनेमुळे तेव्हा भारताचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं.

७ डिसेंबर १९८९ रोजी चंडीगडमधील मोहाली येथील सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये लागलेल्या एका रहस्यमय आगीने या प्लँटमधील प्रॉडक्शन लाईनला नष्ट केलं होतं. सेमिकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेडची स्थापना १९७६मध्ये स्वदेशी चिप्स तयार करण्यासाठी करण्यात आली होती. या सेमीकंडक्टर प्लँटने १९८४ मध्ये उत्पादन सुरू केलं होतं. तसेच ५०० नॅनोमीटर चिप्सचं उत्पादन येथे होत होतं. तंत्रज्ञान आणि कामगिरीच्या दृष्टीने ही चिप जगातील इतर देशांमध्ये तयार होणाऱ्या चिपच्या तुलनेत एक जनरेशन मागे होती.

जगातील दिग्गज कंपनी असलेल्या इंटेलने जगातील पहिला कमर्शियल मायक्रोप्रोसेसर तयार केल्यानंतर १३ वर्षांनी आणि सध्या चिप निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टीएसएमसीचा दबदबा जगभरात आहे त्याने उत्पादन सुरू केल्यापासून तीन वर्षांनंतरची ही गोष्ट आहे,

सरकारी प्रकल्प असूनही एससीएलने चांगलीच प्रगती केली होती. यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटचा समावेश होता. या संस्था अधिक अत्याधुनिक सेमीकंडक्टरवर काम करत होत्या. मात्र एका रहस्यमयरीत्या लागलेल्या आगीने भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न जाळून खाक केलं होतं.

अधिकृतरीत्या या आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. मात्र या आगीबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांच्या मते ही दुर्घटना होती. तर अनेक जण ही आग कटकारस्थान असल्याचा दावा करतात. ही आग प्लँटमध्ये एकाचवेळी विविध ठिकाणी लागली होती. त्यामुळे या आगीमागे काहीतरी घातपात होता या दाव्याला दुजोरा मिळतो. मात्र तसे अधिकृतरीत्या कधीही सांगण्यात आलं नाही.

१९८९ साली लागलेल्या या आगीमुळे सुमारे ७५ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. मात्र या आगीची खूप किंमत देशाला मोजावी लागली. २०२४ मध्ये भारताने सुमारे १ लाख ७१ हजार कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर चिप आयात केल्या होत्या. तसेच देशाची सेमिकंडक्टरवरील आयात दरवर्षी १८ टक्क्यांनी वाढत आहे.

एससीएल आपलं उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे एक दशक लागलं. तसेच १९९७ साली जेव्हा कंपनी पुन्हा सुरू झाली तोपर्यंत ती इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप मागे पडली होती. २०० साली काही अटींवरून खाजगी गुंतवणुकदारांसोबत झालेल्या मतभेदांमुळे एससीएलमधील काही समभाग विकण्याचे सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

पुढे २००६ मध्ये सरकारने कंपनीला अंतराळ विभागांतर्गत एक संशोधन आणि विकास केंद्राच्या रूपात पुनर्गठित करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याचं नामकरण सेमीकंडक्टर लॅब असं केलं.