Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:54 IST2025-11-11T17:37:13+5:302025-11-11T17:54:23+5:30
Suraj Tiwari : रेल्वे अपघातात एक हात, दोन पाय गमावलेल्या सूरज तिवारीने अनेक अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे.

रेल्वे अपघातात एक हात, दोन पाय गमावलेल्या सूरज तिवारीने अनेक अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. परिस्थिती कशीही असो दृढनिश्चय असेल तर काहीही शक्य असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे.

सूरज तिवारी हा मैनपुरी जिल्ह्यातील कुरावली तहसीलमधील मोहल्ला घरनाजपूरचा रहिवासी आहे. त्याने महर्षी परशुराम शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २०१४ संपूर्णानंद इंटर कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण केली. सूरजचे वडील शिंपी म्हणून काम करत होते.

२४ जानेवारी २०१७ हा दिवस सूरजसाठी अत्यंत वेदनादायी होता. दादरी, गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय, एक हात आणि एका हाताची तीन बोटं गमावली.

सूरज अनेक महिने रुग्णालयात होता. घरी परतल्यानंतरही तो जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होता. काही महिन्यांनंतर त्याच्या भावाचंही निधन झालं.

सूरजने आपल्या कुटुंबाचीही काळजी घेतली. २०१८ मध्ये तो दिल्लीला परतला आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बीएसाठी एडमिशन घेतलं. २०२१ मध्ये बीए पूर्ण केल्यानंतर त्याने एमएसाठी एडमिशन घेतलं.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परिस्थितीत सूरजने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देण्याचा दृढनिश्चय केला होता. त्याला माहित होतं की हे सोपं नाही.

सूरजने दिवसरात्र काम करून यूपीएससी परीक्षेची तयारी केली, दिवसाचे १५ ते १७ तास अभ्यास केला. त्याने कोचिंग किंवा एक्स्ट्रा क्लासेस न करता UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली.

सूरज तिवारीने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा २०२२ मध्ये मोठं यश मिळवलं. या यशामुळे त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी मिठाई वाटून सूरजच्या यशाचा आनंद साजरा केला.

२०२२ च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत त्याने ९१७ वा रँक मिळवला. त्याच्या रँकच्या आधारे त्याची इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस (IIS) साठी निवड झाली. तो एक IIS अधिकारी आहे.

सूरज तिवारीची ही गोष्ट लाखो तरुणांसाठी एक उदाहरण आहे जे कठीण परिस्थितीतही आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

















