ज्योती मल्होत्राशी बोलला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला! युट्यूबर जसबीर सिंहने काय काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:17 IST2025-06-04T15:10:21+5:302025-06-04T15:17:27+5:30

YouTuber Jasbir Singh : जसबीर ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे थेट संबंध पाकिस्तानी हेर जट्ट रंधावा उर्फ शाकीर याच्याशी असल्याचे समोर आले आहे.

पंजाब पोलिसांनी पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश करत रूपनगर जिल्ह्यातील युट्यूबर जसबीर सिंह याला अटक केली आहे. जसबीर ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे थेट संबंध पाकिस्तानी हेर जट्ट रंधावा उर्फ शाकीर याच्याशी असल्याचे समोर आले आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर माहिती दिली. जसबीरला एसएसओसीने अटक केली असून, सध्या त्याला मोहाली न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

तपासात उघड झाले आहे की, जसबीर सिंहचा संपर्क हरियाणाच्या ज्योती मल्होत्रा आणि पाक उच्चायोगातील हद्दपार अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशी होता. ज्योतीच्या अटकेनंतर जसबीरचे नाव समोर आले आणि दोघांमध्ये झालेल्या अनेक संभाषणांमुळे जसबीर पाकिस्तानी नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचा संशय बळावला.

जसबीरच्या मोबाईलमधून पाकिस्तानशी संबंधित गुप्त क्रमांक, आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडले आहेत, जे बनावट नावांनी सेव्ह करण्यात आले होते. या डेटाचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जसबीरने २०२०, २०२१ आणि २०२४मध्ये तीनदा पाकिस्तानला भेट दिली होती. यातील एकदा तो दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह काही व्लॉगर्सची भेट घेतली होती.

ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने आपले डिजिटल पुरावे डिलिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तांत्रिक मार्गांनी अनेक महत्त्वाचे संदेश आणि फाईल्स रिकव्हर केल्या आहेत.

तपासात असेही समोर आले आहे की, जसबीरने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवली होती. यामध्ये चॅट्स डिलीट करण्याचा देखील प्रयत्न झाला होता.