स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:19 IST2025-11-21T17:04:07+5:302025-11-21T17:19:32+5:30

Sleeper Vande Bharat Train Updates: आताच्या घडीला दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार असून, देशभरात ट्रायल रन सुरू आहेत. पण काही कारणास्तव स्लीपर वंदे भारत ट्रेन परत पाठवण्यात आली आहे.

Sleeper Vande Bharat Train Updates: आताच्या घडीला स्लीपर वंदे भारत या ट्रेनचे कधी लोकार्पण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्लीपर वंदे भारतचे दोन प्रोटोटाइप तयार करण्यात आले असून, यापैकी पहिल्या प्रोटोटाइप मॉडेलची ट्रायल देशभरात सुरू आहे.

Vande Bharat Sleeper Train Updates: पहिल्या प्रोटोटाइप व्हर्जनच्या दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार आहेत. दोन्ही स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल रन देशभरात सुरू आहेत. देशातील विविध भागात या स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी सुरू आहे. अलीकडेच अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली.

परंतु, यातच आता पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ट्रायलनंतर परत पाठवण्यात आली आहे. या पहिल्या स्लीपर वंदे भारतमध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या आहेत. देशभरात ट्रायल रन झाल्यानंतर आता पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.

भारतीय रेल्वे लवकरच पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी करत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत बोलताना सांगितले की, अत्याधुनिक स्लीपर वंदे भारत ट्रेन या वर्षी डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते. देशभरात चाचणी घेण्यात आल्यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप रेक परत पाठवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुचवलेले बदल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितले की, पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचणीनंतर डबे आणि सीटमध्ये किरकोळ बदल सुचवण्यात आले होते. आता अंमलात आणले जात आहेत. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या चाचणी दरम्यान आढळलेल्या सगळ्या समस्या सोडवल्या जात आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये करण्यात येत असलेले हे बदल किरकोळ आहेत. परंतु प्रवाशांच्या आरामदायी सर्वोच्च मानकांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट असल्याने ते महत्त्वपूर्ण मानले जातात. प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेवर भर देताना वैष्णव म्हणाले की, आम्ही 'शॉर्टकट'वर विश्वास ठेवत नाही. कारण आम्हाला एक चांगले उत्पादन तयार करायचे आहे.

पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे मार्ग आणि संभाव्य तारखेबाबत विचारले असता अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आम्ही डिसेंबरमध्ये ही ट्रेन चालवण्यास सुरुवात करू. १० स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवणाऱ्या BEML च्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन आणि रेल्वे सेफ्टी कमिशनर यांच्या देखरेखीखाली झालेल्या चाचणीनंतर पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये किरकोळ बदल आवश्यक आहेत.

रेल्वे मंत्रालयाने २८ ऑक्टोबर रोजी १६ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनना मंजुरी दिली. तसेच कामगिरीत सुधारणा आणि सुरक्षिततेशी संबंधित अनेक शिफारशी केल्या. यामध्ये आग प्रतिबंधक उपकरणांसाठी आर्क फॉल्ट डिटेक्शन डिव्हाइसेसची स्थापना, एसी डक्ट्सचे स्थलांतर, सीसीटीव्हीसाठी अग्नि-बचाव केबल्स, युरोपियन मानकांचे EN 45545 (अग्नि सुरक्षा) आणि EN 15227 (क्रॅश प्रतिरोध) चे स्वतंत्र मूल्यांकन, आपत्कालीन अलार्म बटणे हलविण्यासाठी सूचना करण्यात आली आहे.

२८ ऑक्टोबरच्या अहवालात असे नमूद केले आहे की, आपत्कालीन अलार्म इंडिकेटर वरच्या बर्थ कनेक्टरजवळ होता, तो नेमकेपणाने दिसत नव्हता. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार होती. रेल्वे मंत्रालयाने स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या पुढच्या रेकसाठी योग्य, सुलभ ठिकाणी तो स्थापित करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन ही राजधानी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनशी जोरदार स्पर्धा करेल, असे म्हटले जात आहे. रेल्वेचा दावा आहे की, ही स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवासाची गुणवत्ता, आरामदायी सेवा आणि सुरक्षिततेच्या बाबतीत एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल.

आताच्या घडीला वंदे भारत ट्रेन चेअर कार सर्वांत लोकप्रिय आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशात वंदे भारतची क्रेझ आहे. देशभरात चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या सेवा अविरत सुरू आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढण्यात आले आहेत. तसेच अनेक ट्रेनचे कोच वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ४ नव्या वंदे भारत ट्रेनचे वाराणसी येथून लोकार्पण केले. या चार नवीन वंदे भारत ट्रेनसह देशात आता १६० हून अधिक नवीन वंदे भारत सेवा कार्यरत आहेत.