आमदार असा हवा! पद बाजुला ठेवून ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढाकार; श्रमदानातून 6 किमीचा रस्ता तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:51 PM2021-09-30T13:51:46+5:302021-09-30T13:58:04+5:30

Naman Vixal Kongadi : थेट आमदारच श्रमदानासाठी उतरल्याने त्यांचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

नेते मंडळी अनेकदा मोठमोठ्या गाड्यांमधून फिरताना दिसतात. तसेच लोकांना फक्त आश्वासन देतात. पण जेव्हा मदत करण्याची वेळ येते तेव्हा अनेक कारणं दिली जातात. पण यामध्ये असेही काही नेते आहेत. जे लोकांच्या हक्कासाठी, मदतीसाठी पुढाकार घेऊन मदतीचा हात देत आहेत.

सध्या अशाच एका आमदाराची जोरदार चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांची समस्या दूर करण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच पूर्ण वेळ श्रमदान करत एका आमदाराने 6 किलोमीटरचा रस्ता बांधला. लोकांच्या हितासाठी ते स्वत: मातीत काम करताना दिसत आहेत.

झारखंडमधील कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगडी यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. आपल्या पदाचा गर्व बाजुला ठेवत स्वतः गावकऱ्यांसह श्रमदान केलं आणि मातीने भरलेल्या टोपल्या उचलून सहा किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केल्य़ाची घटना समोर आली आहे.

कोलेबिरामधील लोकांना त्यांच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता खराब असल्याने अनेक अडचणींचा सामना कराला लागत आहे. एरंगा झरिया, झपला टोली, शारदा टोली, दुलमी टोली, सोकोरला, टुटीकेल येथील ग्रामस्थांना खराब रस्त्यामुळे समस्या येत होत्या.

गावकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. आता थेट आमदारच श्रमदानासाठी उतरल्याने त्यांचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

झापला या गावात महिला आणि पुरुषांसाठी फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये आमदार नमन विक्सल कोंगडी यांना निमंत्रित केलं. त्यानुसार आमदार अंतिम सामना पाहण्यासाठी ते आले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदारांनी श्रमदान सुरू केलं.

थेट आमदार नमन कोंगडी रस्त्यावर उतरून काम करू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता बनवण्यासाठी आमदारांकडे मदत मागितली तेव्हा आमदारांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिलं.

श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी आमदारांनी केवळ जेवणाची व्यवस्था केली नाही तर त्यांनी स्वतः मातीचा भार खांद्यावर घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं आणि रस्ता दुरुस्त केला. रस्ता तयार करण्यासाठी काही ट्रॅक्टर चालकांनी देखील मदत केली आहे.

गावकऱ्यांना रस्ता खराब असल्याने संपर्क साधणं देखील अवघ़ड झालं होतं. ये-जा करताना अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे रस्त्याचा कामासाठी सातत्याने प्रशासनाकडे मदत मागितली जात होती. पण आता आमदाराच्या श्रमदानाने ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न सुटला असून आंनंदाचं वातावरण आहे.

कोलेबिरा ब्लॉक अध्यक्ष सुनील खाडिया, कोलेबिरा ब्लॉक प्रतिनिधी सुलभ नेल्सन डंगडुंग आणि श्यामलाल प्रसाद यांनीही आमदारांसह श्रमदानात सहभाग घेतला. लोकांमध्ये सहभागी होऊन आमदार करत असल्याने सध्या त्यांच्या कामाची जोरदार चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.