सेक्स सीडीने राजस्थानच्या राजकारणात खळबळ; याआधी हे ५ नेतेही अडकले होते वादात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 02:23 PM2024-01-07T14:23:00+5:302024-01-07T15:06:13+5:30

एखाद्या राजकीय नेत्याची सेक्स सीडी व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक लोकप्रतिनिधींचे असे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

काँग्रेसच्या माजी आमदाराचा एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मेवाराम जैन असं सेक्स सीडी व्हायरल झालेल्या काँग्रेसच्या माजी आमदारांचं नाव आहे. हा व्हिडिओ समोर येताच काँग्रेसने मेवाराम जैन यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र एखाद्या राजकीय नेत्याची सेक्स सीडी व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक लोकप्रतिनिधींचे असे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांना त्याची राजकीय किंमतही मोजावी लागली आहे.

काँग्रेस नेते एन. डी. तिवारी - काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले नारायण दत्त तिवारी हेदेखील कधीकाळी सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते. आंध्र प्रदेशचे राज्यपाल राहिलेल्या तिवारी यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. एका तेलुगू वृत्तवाहिनीने तिवारी यांचा जवळपास एक तासाचा व्हिडिओ प्रदर्शित करत खळबळ उडवून दिली होती.

'आप'चे नेते संदीप कुमार : भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला आम्हीच पर्याय आहोत, असा दावा करून दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षालाही सेक्स सीडीने अडचणीत आणलं होतं. केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असलेले आपचे नेते संदीप कुमार यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते दोन महिलांशी अश्लील कृत्य करत असल्याचं दिसत होतं. व्हिडिओ व्हायरल होताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

काँग्रेस आमदार सुरेश राजे : मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश राजे यांचीही सेक्स सीडी समोर आली होती. सुरेश राजे यांना व्हिडिओ शूट केला जात असल्याची कल्पना असतानाही ते महिलेसोबत अश्लील चाळे करत असल्याचं दिसून आलं होतं.

आमदार उमेश कुमार - उत्तराखंडमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार उमेश कुमार हेदेखील सेक्स स्कँडलमुळे वादात सापडले होते. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ माझा नसून डीपफेक असल्याचा दावा आमदार कुमार यांनी केला होता.

काँग्रेस नेते महिपाल मदेरणा- राजस्थानमध्ये २०११ सालीही सेक्स सीडीने राजकीय भूकंप आला होता. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री महिपाल मदेरणा यांचा हा व्हिडिओ होता. सप्टेंबर २०११ मध्ये एका वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता. या वादानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मदेरणा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.