पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:54 IST2025-08-29T09:07:23+5:302025-08-29T09:54:29+5:30
RSS Mohan Bhagwat on Pm Modi retirement : गेल्या काही काळापासून पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीबद्दल अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे

RSS Mohan Bhagwat on Pm Modi retirement :
सध्या भारताच्या राजकारणात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च नेते आहेत. मोदींच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय घेतला जात नाही.
भाजपा या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे देशाच्या राजकारणात संघाची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते.
अशातच काही काळापासून मोदी हे ७५ वर्षांचे झाले की, राजकीय निवृत्ती घेऊ शकतात किंवा संघाचे नेतृत्व त्यांना निवृत्ती घेण्यास सांगू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली की त्यानंतर त्यांना खरंच राजकीय निवृत्ती घ्यावी लागेल का, या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या तीन दिवसीय अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, "७५ वर्षांनंतर निवृत्त व्हायलाच पाहिजे असे मी कधीही म्हटलेले नाही."
"संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू. कुणी ८०व्या वर्षी मला शाखेत काम करायला सांगितलं तर मी करेन. निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही, तर संघाच्या कार्याशी जोडलेली आहे."
"मी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी निवृत्तीचा निर्णय ठरवत नाही. आम्ही कधीही निवृत्त होण्यासाठी तयार आहोत, तसेच संघाला आमची गरज असेपर्यंत काम करायलाही सज्ज आहोत."