माझ्या गावाकडं चलं माझ्या दोस्ता... मजूर अन् विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:06 PM2020-05-09T15:06:12+5:302020-05-09T15:26:04+5:30

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे.

त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गत ही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

रेल्वेतून आपल्या गावी म्हणजेच आपल्या राज्याकडे निघालेल्या प्रवाशांनी टाळ्या वाजवून प्रशासनाचे आभार मानले, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांना झालेला आनंद स्पष्ट करत होता.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे लॉकडाऊनच्या तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.

पुण्यात एमपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही घेऊन पहिली बस पुण्यातून नगरच्या दिशेने रवाना झाली

पुण्यातून गावी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुटका झाल्याचा आनंद दिसत होता. तर, इतरही विद्यार्थ्यांना आता लवकरच गावाकडे जायला मिळेल, ही आशा लागून राहिली आहे.

देशभरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्यात येत असून जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथेही परराज्यातील प्रवाशांना बसमधून पाठविण्यात येत आहे

गेली अनेक दिवस शेल्टर होममध्ये राहिलेल्या या नागरिकांची प्राधान्याने घरवापसी करण्यात आली.

रेल्वे स्थानकावरही सामाजिक अंतर ठेऊन, त्यासाठी आखणी करुन व निर्जंतुकीकरणानंतरच प्रवाशांना रेल्वे डब्ब्यात बसविण्यात आले.

रेल्वेत किंवा प्रवासासाठी निघण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी बंधनकारक असल्याने स्थलांतरीतांची वैद्याकीय तपासणी करण्यात आली

कर्नाटकच्या बंगळुरु येथून श्रमिक ट्रेन रद्द झाल्यानंतर स्थानकावर आलेल्या प्रवाशांची मोठी धांदल उडाली होती. प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली