पाहा: सर्वात मजबूत रनगाडे अन् घातक मिसाईल वाढवतायत भारताची शान!

By मोरेश्वर येरम | Published: January 26, 2021 10:57 AM2021-01-26T10:57:20+5:302021-01-26T11:06:33+5:30

प्रजासत्ताक दिनी यावेळी सैन्य दलाच्या संचलनामध्ये अत्याधुनिक रनगाडे आणि मिसाइलचं दर्शन घडवलं जात आहे. सैन्य दलाची ताकद दाखवणाऱ्या शस्त्रांबद्दल जाणून घेऊयात..

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात देशातील अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश असणार आहे. यंदा पहिल्यांदाच राफेल युद्धविमानं देखील सामील होणार आहेत. तर दुसऱ्याबाजूला टी-९० टँकसह जबरदस्त ताकदीचे रनगाडे पाहायला मिळतील.

प्रजासत्ताक दिनाच्या यंदाच्या संचलनात संरक्षण मंत्रालयाकडून ६ रथ सामील होणार आहेत. तर केंद्रीय मंत्रालय आणि अर्धसैन्य दलाच्या ९ तुकड्यांसह एकूण ३२ तुकड्या देशाच्या ताकदीचं दर्शन घडवणार आहेत.

भारताच्या संचलनादरम्यान टी-९० भीष्म, इन्फेंट्री कॉम्बेट वाहन, अपग्रेडेड शिल्का वेपन सिस्टम यांसह ब्राम्होस मिसाइलची मोबाइल प्रक्षेपण प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालीसह इतर हत्यारांचं संचलन होत आहे.

ब्राम्होस मिसाइल पाहण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात. मिसाइलची गती आणि परिणामकारकता शत्रूंना धडकी भरवणारी आहे. या मिसाइलचा वेग तब्बल ३४५७ किमी प्रतितास इतका आहे.

अपग्रेडेड शिल्का वेपन सिस्टममध्ये हवाई मार्गातून होणाऱ्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याती ताकद आहे.

जगातील सर्वात ताकदवान आणि मजबूत टी-९० टँक देखील या संचलनाची शान वाढवत आहे. थर्ड जनरेशनचा हा अत्याधुनिक टी-९० रणगाडा भीष्म या नावाने ओळखला जातो. यात १२५ मिलीमीटरची गन असून यातून विविध प्रकारे मारा करण्याची ताकद आहे.

भारतीय नौदलाकडून यावेळी १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धाची कहाणी सांगणारा रथ सादर केला जाणार आहे. यात आयएनएस विक्रांतची प्रतिकृती दाखवली जाणार आहे. यावर भारतीय हवाई दलाचे तेजस हे युद्धविमान आणि मिसाइल ध्रुवास्त्र सादर केले जाणार आहेत.

डीआरडीओकडून यंदाच्या संचलनात दोन रथ संचलनात सहभागी होणार आहेत. डीआरडीओकडून यंदा लाइट कॉम्बेट एअरक्राफ्टच्या टेकऑफची प्रतिकृती दाखवली जाणार आहे. याशिवाय, अँटी टँक गायडेड मिसाइलचा (ATGM) रथ दाखवला जाणार आहे.

DRDO च्या दुसऱ्या रथामध्ये अँटी टँक गायडेड मिसाइलची (ATGM) प्रतिकृती दाखवली जाणार आहे. यात NAG, HELINA, MPATGM, SANT आणि अर्जुन टँकसाठी तयार करण्यात आलेल्या मिसाइलची प्रतिकृती दाखविण्यात येत आहे. डीआरडीओचे युवा वैज्ञानिक शैलादित्य भौमिक सादर करणार आहेत.