शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम! एका झटक्यात ५ खासदार फुटले, 'मोदींचे हनुमान' फक्त पाहात राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 3:49 PM

1 / 11
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. महाराष्ट्रानं गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर याचा अनुभव घेतला. सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी घडल्या. त्यावेळच्या घटना अनेकांना आजही लक्षात आहेत.
2 / 11
महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये सुरू आहे. मोठ्या राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पुतण्याचा काकांनी टप्प्यात येताच अचूक कार्यक्रम केला आहे. त्यामुळे पुतण्याला जोरदार धक्का बसला आहे.
3 / 11
बिहारच्या राजकारणात कधी काळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोक जनशक्ती पक्षात आता उभी फूट पडली आहे. रामविलास पासवान यांनी या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग यांनी धुरा सांभाळली. मात्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर अवघ्या ८ महिन्यांत चिराग एकटे पडले आहेत.
4 / 11
रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी टाकलेल्या डावामुळे चिराग चीतपट झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्या निर्णयानं संयुक्त जनता दलाचं (जेडीयू) प्रचंड मोठं नुकसान झालं. त्याचा बदला आता जेडीयूनं घेतला आहे.
5 / 11
चिराग पासवान लोकसभेत लोजपच्या खासदारांचे गटनेते होते. मात्र इतर पाच खासदारांनी पारस यांना गटनेते करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. त्यांची मागणी मान्य झाली. चिराग पासवान यांना हटवून पारस यांची गटनेतेपदी निवड झाली.
6 / 11
गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी एनडीएतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला चिराग वगळता सर्वांचा विरोध होता. मात्र चिराग यांनी कोणाचंही ऐकलं नाही. चिराग यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यांनी भाजपला उघड मदत करत जेडीयूचं खूप मोठं नुकसान केलं.
7 / 11
स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणणाऱ्या चिराग यांनी जेडीयूला धक्का दिला. जेडीयूच्या जागा ४३ वर आल्या. तर भाजपला ७० हून अधिक जागा मिळाल्या. चिराग यांच्यामुळेच जेडीयू बिहारमध्ये भाजपचा लहान भाऊ झाला. चिराग यांना धडा शिकवून बदला घेण्याची योजना तेव्हापासून आखली जात होती.
8 / 11
जेडीयूचं नुकसान करण्याच्या प्रयत्नात लोजपचंही खूप नुकसान झालं. त्यांचा केवळ एक उमेदवार विजयी झाला. त्यालाही निवडणुकीनंतर अवघ्या महिनाभरात जेडीयूनं आपल्याकडे खेचलं. त्यानंतर दुसऱ्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली.
9 / 11
जेडीयूच्या २ नेत्यांनी ऑपरेशन लोजपमध्ये मोलाची भूमिका बजावली. खासदार राजीव रंजन आणि बिहार विधानसभा उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांनी दिल्लीत बसून लोजप फोडण्याची योजना आखली. चिराग यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा त्यांना फायदा झाला.
10 / 11
चिराग यांचे काका आणि खासदार पशुपती पारस यांचे जेडीयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. आधीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. चिराग यांनी एनडीएबाहेर जाऊ नये असं त्यांचं मत होतं. मात्र चिराग यांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे पारस नाराज झाले.
11 / 11
चिराग पासवान पक्षातील इतर खासदारांच्या मतांनाही फारशी किंमत द्यायचे नाहीत. त्याचा फायदा ऑपरेशन लोजप दरम्यान जेडीयूच्या नेत्यांना झाला. पासवान यांना जराही चाहूल लागू न देता जेडीयूनं लोजपला सुरुंग लावला. आता चिराग स्वत:च्याच पक्षात एकटे पडले आहेत. जेडीयूनं विधानसभेचा बदला अवघ्या वर्षभरात घेतला आहे.
टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी