'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:27 IST2025-08-20T19:22:02+5:302025-08-20T19:27:38+5:30

CCPA fines Rapido: बाईक टॅक्सी, ऑटो आणि कॅब सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राईड हेलिंग सेवा पुरवणाऱ्या रॅपिडोला एका प्रकरणात झटका बसला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर कंपनीला ग्राहकांना पैसे परत देण्याचे आदेशही देण्यात आला आहे.

रॅपिडो कंपनीला एका दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणात हा दंड ठोठावण्यात आला आहे. सीसीपीए (केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण) म्हटले की, १२० शहरांमध्ये अनेक भाषांमध्ये ५४८ दिवस ही जाहिरात करण्यात आली.

जून २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान, रॅपिडोकडे १२०० ग्राहकांनी तक्रारी केल्या. त्यापैकी निम्म्याच ग्राहकांचे समाधान करता आले. जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल झाल्याचे सीसीपीएने म्हटले आहे.

रॅपिडोने ग्राहकांना खोटी ऑफर दिली आणि ५० रुपयांचा लाभ रोख नाही, तर रॅपिडो कॉईन्समध्ये दिला. हे कॉईन्स फक्त सात दिवसांसाठीच वैध होते आणि फक्त बाईक राईडसाठीच वापरता येऊ शकत होते.

सीसीपीएने आदेश देताना म्हटले की, रॅपिडोने ग्राहकांची दिशाभूल करण्यासाटी अशी पद्धत स्वीकारली. सेवेबद्दल जास्त सांगण्यात आले आणि मुख्य गोष्टी लपवल्या गेल्या.

५ मिनिटांत ऑटो नाही, तर मिळवा ५० रुपये ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे, असे नमूद करत सीसीपीएने रॅपिडोला दहा लाखांचा दंड आणि सर्व ग्राहकांना पैसे परत देण्याचे आदेश दिले आहे.