राजा विक्रमादित्याने कशी शोधली होती त्रेतायुगातील अयोध्या? अशी सापडली रामललांची जन्मभूमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:14 AM2024-01-11T11:14:32+5:302024-01-11T11:19:55+5:30

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होण्यास आता अवघा ११ दिवसांचा अवधी उरला आहे. ११ दिवसांनंतर येथील मंदिरामधून रामलला भक्तांना दर्शन देणार आहेत. मात्र रामललांची जन्मभूमी कशी सापडली? जिथे आज मंदिर उभारलं जात आहे तीच जन्मभूमी होती हे कसं समजलं. सत्ययुगापासून कलियुगापर्यंतचा राम जन्मभूमीचा इतिहास काय आहे. उज्जैन येथील राजा विक्रमादित्य याने अयोध्येचा शोध कसा घेतला? याची रोमांचक कहाणी अशी आहे.

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होण्यास आता अवघा ११ दिवसांचा अवधी उरला आहे. ११ दिवसांनंतर येथील मंदिरामधून रामलला भक्तांना दर्शन देणार आहेत. मात्र रामललांची जन्मभूमी कशी सापडली? जिथे आज मंदिर उभारलं जात आहे तीच जन्मभूमी होती हे कसं समजलं. सत्ययुगापासून कलियुगापर्यंतचा राम जन्मभूमीचा इतिहास काय आहे. उज्जैन येथील राजा विक्रमादित्य याने अयोध्येचा शोध कसा घेतला? याची रोमांचक कहाणी अशी आहे.

त्रेतायुगामधील श्रीरामांची अयोध्या अनेकदा नष्ट झाली आणि पुन्हापुन्हा वसवली गेली. मात्र मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही येथे दिसतात. त्यांचा शोध घेण्यामध्ये राजा विक्रमादित्य यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंतची लाखो वर्षे आणि कलियुगातील हजारो वर्षांनंतर ही अयोध्या कशी सापडली, याबाबतचं श्रेय राजा विक्रमादित्य याला दिलं जातो. इतिहासकार सांगतात की, इसवी सनपूर्व ५७ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी गुप्तार घाटावर राजा विक्रमादित्य विश्रांती घेत होता. त्यावेळी त्यांची भेट तीर्थराज प्रयागशी झाली. तीर्थराज प्रयागराजच्या प्रेरणेतूनच राजा विक्रमादित्य याने राम जन्मभूमीचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याची भेट लोमस ऋषींशी झाली. लोमस ऋषींच्या सल्ल्यानुसार राजा विक्रमादित्य यांनी पुढे पाऊल टाकलं.

अयोध्येचा इतिहास अतिप्राचीन आहे. हे शहर मनूने वसवले, असे सांगितले जाते. प्राचीन काळातील कौशल देशातील सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र याची राजधानीसुद्धा अयोध्या होती. त्यानंतर अनेक पराक्रमी राजांनंतर त्रेतायुगामध्ये श्रीरामांचा जन्म झाला. त्यांच्या रामराज्याची कल्पना आजही केली जाते. पुढे कालचक्र फिरले आणि अयोध्येचा पराभव झाला. त्यानंतर राजा विक्रमादित्य जेव्हा अयोध्येचा शोध घेण्यासाठी राजा विक्रमादित्य निघाले तेव्हा एका गाईने त्याची मदत केली याचीही रंजक कहाणी सांगितली जाते. अयोध्येवर संशोधन करणारे आचार्य मिथिलेशनंदनीशरण यांनी सांगितले की, एका ठिकाणी जमिनीवर गाय दुग्धाभिषेक करत होती. त्यावरून राजा विक्रमादित्याने राम जन्मभूमीची ओळख पटवली आणि राम जन्मभूमी सापडली.

त्रेतायुगातील अयोध्या कलियुगात शोधण्याचे आणि पुनर्स्थापित करणाऱ्या राजा विक्रमादित्याबाबत ऐतिहासिक पुराव्यांचा उल्लेख रुद्रायमल ग्रंथामध्येही सापडतो. रुद्रायमल ग्रंथामध्ये राजा विक्रमादित्य आणि जन्मभूमीबाबत काही ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख आढळतो. अयोध्येचा शोध पूर्ण झाल्यावर राजा विक्रमादित्याने येथे ३६० हून अधिक मंदिरं बांधली. त्यामध्ये एका भव्य राम मंदिराचाही समावेश होता. राजा विक्रमादित्याने अयोध्येचा जिर्णोद्धार केला होता. असं सांगतात की रामललांचं जे मंदिर राजा विक्रमादित्यने बांधलं होतं तेच १५२८ मध्ये मीर बाकी याने पाडलं होतं. अयोध्येचा शोध घेत असताना नागेश्वरनाथ मंदिरानेही राजा विक्रमादित्यला मार्ग दाखवला होता. अयोध्येचा शोध राजा विक्रमादित्यासाठी आव्हानात्मक होता. मात्र त्याने हे काम अगदी अचूकपणे पूर्णत्वास नेले. स्कंद पुराणामध्येही अयोध्येचा उल्लेख सापडतो.

राजा विक्रमादित्यानंतर अनेक राज्यकर्त्यांनी अयोध्येचा विकास केला. गुप्तकाळातील राजे आणि गहडवाल राजांनीही त्यात मोठं योगदान दिलं. प्राचीन अयोध्येबाबत अनेक ऐतिहासित पुरावे उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उल्लेख सापडतो. पाश्चात्य लेखक हंस बेकर यांच्या पुस्तकामध्येही अयोध्येच्या इतिहासाबाबत अनेक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या पुस्तकात हंस बेकर यांनी रामजन्मभूमी, अयोध्या आणि राजा विक्रमादित्य यांच्याबाबत लिहिलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये कशी आणि किती अंतरावर धार्मिक स्थळं आहेत, याचा उल्लेख आहे. या पुस्तकामुळे तोंडी सांगितल्या जाणाऱ्या इतिहासाला अधिक बळ मिळालं आहे.

अयोध्येमध्ये असलेली मुक्ती गल्ली हीसुद्धा राजा विक्रमादित्य याच्या शोधकार्यामध्ये निर्णायक ठरली होती. रामजन्मभूमीच्या शोधकार्यात मुक्ती गल्लीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राजा विक्रमादित्याने केवळ श्रीरामांच्या अयोध्येचा केवळ शोधच घेतला नाही तर तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र परकीय आक्रमणं आणि मुघलकाळाता मोठी उलथापालथ झाली आणि येशील सर्व काही खंडीत झालं. मात्र आता अयोध्येतील वैभव तिला पुन्हा प्राप्त होत आहे. तसेच २२ जानेवारी रोजी येथे पुन्हा एकदा राम मंदिराची पुनर्स्थापना होत आहे.