राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 03:41 PM2023-12-06T15:41:31+5:302023-12-06T15:44:48+5:30

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून भाजपाने लोकसभा २०२४ ची सेमी फायनल जिंकली. तेलगंणा आणि मिझोराम हे दोन अपवाद वगळता विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा डंका पाहायला मिळाला.

राजस्थानच्या जनतेने आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला आणि भाजपाकडे सत्तेच्या चाव्या सोपवल्या. राजस्थानमधील निकाल विविध कारणांमुळे महत्त्वाचा ठरला. यातीलच एक कारण म्हणजे इथे प्रथमच चार योगी-महंत आमदार बनले आहेत.

विधानसभेवर पोहचलेल्या या बाबांचा प्रमुख चेहरा म्हणजे बाबा कमलनाथ. त्यांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाते.

बाबा कमलनाथ यांना राजस्थानचा योगी असेही संबोधले जाते. ते आमदार होण्यापूर्वी अलवट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आता त्यांना आपल्या एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

बाबा कमलनाथ तिजारा विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. त्यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ३९ वर्षीय कमलनाथ पुढील मुख्यमंत्री असू शकतात असेही बोलले जात आहे.

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत. त्यांना ९७४ मतांनी निसटता विजय मिळवता आला. ते हातोज धामचे संत असून, भारतीय संत समाज आणि राजस्थानचे प्रमुखही आहेत.

एक आक्रमक हिंदू नेता म्हणून बालमुकुंदाचार्य यांची ओळख आहे. निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ते जयपूरच्या रस्त्यांवरून मांसाहारी दुकाने हटवण्यास सांगत आहे.

महंत प्रताप पुरी हे तारातारा मठाचे महंत आहेत. पोखरण मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले. त्यांनी आपल्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्याचा ३० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

ओटाराम देवासी हे त्यांच्या देवासी समाजाचे धर्मगुरू आहेत. राजस्थानातील सिरोही जिल्ह्यात या समाजाचा मोठा मतदार आहे. त्यांनी सिरोही मतदारसंघातून निवडणूक लढवली अन् आमदार झाले.

ओटाराम देवासी हे भाजपाचे जेष्ठ नेते आहेत. ते २००८ मध्ये देखील आमदार बनले होते, ते वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत.