कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:11 IST2025-11-09T13:07:47+5:302025-11-09T13:11:44+5:30

राजस्थानातील एका उद्योगपतीने त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी भेट दिलेल्या कारवर VIP नंबरसाठी ३१ लाख रूपये खर्च केले आहेत. ज्यातून ते चर्चेत आले आहेत. १ नंबर कायम त्यांच्यासाठी आकर्षक राहिला असून तो आता त्यांच्या आवडीचा नंबर बनला आहे असं उद्योगपती राहुल तनेजा यांनी म्हटलं.

मोबाईल नंबरपासून ते कारपर्यंत त्यांच्या प्रत्येक वाहनावर १ नंबर आहे. परंतु मुलासाठी घेतलेल्या या नवीन गाडीचा नंबर सर्वात खास आहे. कारण सात वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी कार घेतली होती, तेव्हा मुलगा रेहान तनेजाला त्यांनी प्रॉमिस केले होते, जेव्हा तो १८ वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या आवडीची कार भेट देईन ज्याचा नंबर १ असेल असं वडिलांनी सांगितले होते.

राहुल तनेजा म्हणतात की, आयुष्याचा काही भरवसा नाही. आपण विचार करतो, पण उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मी जिवंत असल्याने मी माझ्या मुलाच्या आनंदासाठी काहीतरी करू शकतो असं त्यांनी म्हटलं.

जयपूर आरटीओमध्ये नुकत्याच झालेल्या ई-लिलावात 'RJ60 CM 0001' या क्रमांकाने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. हा नंबर तब्बल ३१ लाखांना विकला गेला, जो राजस्थानमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा नोंदणी क्रमांक ठरला.

जयपूरचे प्रसिद्ध उद्योगपती राहुल तनेजा यांनी त्यांच्या मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेल्या लक्झरी कारसाठी हा नंबर विकत घेतला आहे. वडिलांकडून व्हीआयपी क्रमांक असलेली आलिशान कार मिळाल्यावर मुलगा रेहानही खुश झाला.

रेहान तनेजा म्हणाला की, नंबर वन म्हणजे फक्त कारचा नंबर नसतो, तर तो अनेक प्रकारे खास असतो. तो आपल्याला आयुष्यात नेहमीच नंबर वन राहण्यास सांगतो असं सांगत त्याने वडिलांचे आभार मानले आहेत.

जयपूर आरटीओ-१ येथे झालेल्या ई-लिलावात एकूण १२ अर्जदारांनी भाग घेतला. लिलाव १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि ३१ ऑक्टोबर रोजी संपला. शेवटी, जयपूरच्या राहुल तनेजा यांनी सर्वाधिक बोली लावली आणि १ क्रमांक मिळवला.

'RJ60 CM 0001' मालिकेतील हा नंबर "चॅम्पियन (CM)" श्रेणीत येतो, जो लक्झरी कार आणि हाय-एंड एसयूव्हीसाठी आवडता मानला जातो. राजस्थानमध्ये पहिल्यांदाच व्हीआयपी नंबरची किंमत ३० लाखांच्या पुढे गेली आहे.

राहुल तनेजा एकेकाळी ऑटो रिक्षा चालवत होते - तनेजा आज एक प्रसिद्ध व्यापारी आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी ते एका छोट्या ढाब्यावर वेटर म्हणून काम करत होते. दोन वर्षे ढाब्यावर काम केल्यानंतर त्यांनी दिवाळीत फटाके विकणे, होळीत रंग, मकर संक्रांतीत पतंग, रक्षाबंधनाला राख्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कॉमिक्स विकणे यापासून ते वर्तमानपत्र डिलिव्हरी बॉय होण्यापर्यंत विविध नोकऱ्या केल्या आहेत.

इतकेच नाही तर जयपूरच्या दुर्गापुरा रेल्वे स्टेशनवर ऑटो रिक्षाही चालवत असे. फॅशन शोमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर त्याने २००० मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि त्यांचे आयुष्य बदलले. आज ते राजस्थानमध्ये त्यांच्या व्हीआयपी-नंबर असलेल्या छंदासाठी ओळखले जातात.

















