Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: १५० दिवस चालली यात्रा, राहुल गांधींच्या 'या' १५ फोटोंची झाली जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:32 AM2023-01-31T11:32:43+5:302023-01-31T12:56:00+5:30

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५० दिवसांत तब्बल ४ हजार ०८० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालण्याची किमया भारत जोडो यात्रेने पूर्ण केली आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५० दिवसांत तब्बल ४ हजार ०८० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालण्याची किमया भारत जोडो यात्रेने पूर्ण केली आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून या पदयात्रेला सुरू होऊन ती सोमवारी जम्मू काश्मीरमध्ये एकतेचा प्रेमाचा संदेश देत ती पूर्ण झाली.

१२ राज्यांच्या या प्रवासात राहुल गांधी यांच्यासोबत अनेकजण जोडले गेले, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, सिनेकलावंत, राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शाळकरी मुले, डॉक्टर, शेतकरी, गाडी मेकॅनिकसह लाखो लोकांनी या यात्रेत सहभागी होत आपण भारत जोडण्यासाठी राहुल गांधींसोबत यात्रेत आल्याचे सांगितले.

यात्रेबाबत राहुल गांधी म्हणाले की, मी लाखो लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. हा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या भेटीचा उद्देश देशाला जोडणे हा होता. हा प्रवास देशभर पसरलेल्या हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात होता. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

१५० दिवसांच्या या प्रवासात राहुल गांधींनी १२ सभांना संबोधित केले. त्याचबरोबर १०० हून अधिक कॉर्नर सभा आणि १३ पत्रकार परिषदा घेतल्या. या व्यतिरिक्त २७५ हून अधिक वॉकिंग इंटरअॅक्शन आणि १००हून अधिक बैठक घेतल्या.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. ही यात्रा कर्नाटकातील मंड्याला पोहोचली तेव्हा सोनिया गांधींनी त्यात सहभाग घेतला होता. त्यावेळी सोनिया गांधींच्या बुटाची लेस सुटली होती, त्यानंतर राहुल गांधींनी त्यांची लेस बांधली होती. सदर फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोहोचली तेव्हा काही लोक 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत होते. त्यावर राहुल गांधींनी 'फ्लाइंग किस' देत सगळ्यांचे मन जिंकले होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली तेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग सिद्धू यांनीही यात सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली होती.

मला त्यांना एक संदेश द्यायचा आहे की, जर तुम्हाला थंडी वाजत लागतेय तर मलाही थंडी लागतेय. मात्र ज्या दिवशी तुम्ही स्वेटर घालाल, त्या दिवशीच मी राहुल गांधी स्वेटर घालेल.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही अनेक वेळा भेट झाली. यात्रेच्या समारोपप्रसंगी प्रियंका गांधी म्हणाल्या, कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत ही यात्रा जिथे जिथे गेली तिथे या यात्रेला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. कारण या देशात अजूनही एक तळमळ आहे. देशाच्या संविधानासाठी, देशाच्या भूमीसाठी.

भारत जोडो यात्रेच्या ९५व्या दिवशी राहुल गांधी कोटा येथे होते. येथे कोटा-लालसोट महामार्गावर त्यांनी बैलगाडीने प्रवास केला. या बैलगाडीत शेतकरी देखील उपस्थित होते. राहुल गांधींनी जवळपास १० मिनिटे बैलगाडीतून प्रवास केला.

१४ डिसेंबर २०२२ रोजी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही भारत जोडो यात्रेत भाग घेतला होता. तत्पूर्वी राहुल गांधी आणि रघुराम राजन यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि सुमारे तासभर त्यांची चर्चा झाली. मात्र रघुराम राजन यांच्या समावेशावरही भाजपाने प्रश्न उपस्थित केले होते. यात्रेत सामील झाल्यावर रघुराम राजन यांनी उत्तर दिले की मी त्या यात्रेत नोकरशहा किंवा अर्थतज्ज्ञ म्हणून सहभागी झालो नाही, तर एक जागरूक आणि संबंधित नागरिक म्हणून सहभागी झालो होतो.

भारत जोडो यात्रा राजस्थानमधील दौसा येथे पोहोचली तेव्हा राहुल गांधी एका शेतकऱ्याच्या घरी थांबले. येथे त्यांनी गवत कापण्याच्या यंत्रावरही हात आजमावला. यादरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही गवत कापण्याचा प्रयत्न केला.

गेल्या महिन्यात ही यात्रा दिल्लीत पोहोचली तेव्हा साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार कमल हसनही पोहोचले. नुकतेच कमल हसन म्हणाले होते की, या देशाचा गमावलेला सन्मान परत आणणे ही आपली जबाबदारी आहे. भारत जोडो यात्रा राजकारणाच्या पलीकडे आहे.

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील खरगोन येथे पोहोचली तेव्हाचे हे चित्र आहे. त्यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगही या यात्रेत सहभागी झाला होता.

दौसा येथील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन आणि सिमंतिनी धुरू यांनीही सहभाग घेतला होता.

काँग्रेसच्या श्रीनगर येथील मुख्यालयापाशी होत असणाऱ्या बर्फवृष्टीचा आनंद घेत राहुल गांधी यांनी एखाद्या खोडकर मुलाप्रमाणं आपल्या बहिणीवर भुसभुशीत बर्फाचा मारा केला.