सातारच्या लेकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; जाणून घ्या कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 04:06 PM2023-03-26T16:06:20+5:302023-03-26T16:09:28+5:30

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. तुम्ही आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना सोशल मीडियावर पाहिले असेल असं मोदी 'मन की बात'मध्ये म्हणाले.

सुरेखा यादव नवा विक्रम प्रस्थापित करत त्या आता वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट बनल्या आहेत असं म्हणत मोदींनी त्यांचे कौतुक केले. ३४ वर्षापूर्वी १३ फेब्रुवारी १९८९ रोजी सुरेखा यादव सहाय्यक लोको पायलट म्हणून नोकरीत रुजू झाल्या.

सुरेखा यादव या मूळच्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. या नोकरीमुळे मला देशभरात एक वेगळी ओळख मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं अशी भावना सुरेखा यादव यांनी व्यक्त केली. तसेच ही नोकरी खूप जबाबदाऱ्यांनी भरलेली आहे ज्यामध्ये कधीही यावे आणि जावे लागते. हे काम अतिशय जबाबदारीचे आहे हे घरच्यांना चांगलेच समजते असंही त्या म्हणाल्या.

सुरेखा यादव यांनी कुटुंबाचे आभार मानले आहेत. नोकरीच्या व्यापात कुटुंबातील सर्वच मला साथ देतात. ते लोक मला जास्त त्रास देत नाहीत. हे सर्व माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय शक्य झाले नसते. लग्नाआधी आई-वडील आणि लग्नानंतर सासरच्यांनी खूप साथ दिल्याचं त्या सांगतात.

वंदे भारतची महिला लोको पायलट बनून मिळालेल्या नव्या ओळखीमुळे सुरेखा यादव खूप आनंदी आहेत. आज जेव्हा आजूबाजूचे लोक भेटतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. मॅडम, तुम्ही वंदे भारत चालवता, हे आधी माहीत नव्हतं, पण आता मला तुमचा अभिमान वाटतो, असं म्हणतात. विशेषतः महिला फार प्रभावित आहेत असं सुरेखा यादव सांगतात.

वंदे भारत चालवायला मिळाली याबद्दल सुरेखा यादव पंतप्रधान मोदींचे आभारी मानतात. सुरेखा यादव म्हणतात की, मी पीएम मोदींची आभारी आहे, जर त्यांनी ही ट्रेन मुंबई विभागात चालवली नसती तर कदाचित मला वंदे भारत चालवण्याची संधी मिळाली नसती असं त्यांनी म्हटलं.

अलीकडेच आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली. त्यासाठी, गेल्या महिनाभरापासून त्या प्रशिक्षण घेत होत्या.

पहिल्या महिला लोको पाललट बनून मूळच्या 'सातारकन्या' असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं. तर निर्धारीत वेळेपेक्षा ५ मिनिट अगोदर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं होतं.

सुरेखा यादव यांनी १९८८ मध्ये रेल्वे विभागात नोकरी जॉईन केली. त्यावेळी, आशियातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. आता, लोको पायलट प्रशिक्षक बनूनही त्या कार्यरत आहेत.

रेल्वे सेवेतील कार्याबद्दल सुरेखा यादव यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. सध्या भारतात १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू असून त्यापैकी पहिल्यांदाच महिला लोको पायलट सुरेखा यांनी ट्रेन चालवली त्याबद्दल रेल्वेमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बातमध्ये सुरेखा यादव यांच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे.