उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 08:06 AM2020-07-15T08:06:01+5:302020-07-15T08:19:12+5:30

सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे...

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर गेल्या दीड वर्षापासून पक्षामध्ये धुमसत असलेल्या संतोषाच्या स्फोट सचिन पायलट यांच्या बंडखोरीच्या निमित्ताने झाला. आता सचिन पायलट यांचे विमान असंतोषाचे इंधन भरून राजकीय धावपट्टीवरून झेपावले असून, आता त्याचे एमर्जंसी लँडिंग होते, क्रॅश लँडिंग होते की ते कुठल्या अन्य धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरून कुठल्याही धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरते याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांच्या बंडखोरीविरोधात आक्रमब भूमिका घेत काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे

सचिन पायलट यांच्यासमोर असलेला पहिला पर्याय म्हणजे काँग्रेसमधील आपल्या दबाव गटाच्या माध्यमातून म्हणजेच समवयीन नेत्यांमार्फत पक्षात सन्मानजनक स्थान मिळवण्यासाठी वाटाघाटी करणे. काँग्रेसमध्ये जतिन प्रसाद, प्रिया दत्त, दीपेंद्र हुड्डा आणि मिलिंद देवरा यांच्यासारखे अनेक युवा नेते सचिन पायलट हे पक्षात राहावे आणि त्यांना योग्य मान-सन्मान मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. या परिस्थितीत ही तरुण नेते मंडळी काँग्रेसच्या नेतृत्वावर दबाव आणू शकते.

सचिन पायलट यांच्यासमोर असलेला दुसरा पर्याय म्हणजे त्यांचे अशोक गहलोत मुक्त काँग्रेस ऑपरेशन अयशस्वी झाले तर काँग्रेसमध्ये शांतपणे राहून बंडखोर आमदारांची संख्या २५ होईपर्यंत वाट पाहणे. जर अशा आमदारांची संख्या २५ च्या वर पोहोचली तर ते अशोक गहलोत यांच्याकडून झालेल्या अपमानाचा बदला घेऊ शकतात. मात्र त्यापूर्वी पक्षाने व्हीप जारी केला तर त्यांना व्हीपचे उल्लंघन केल्या प्रकरणी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारपदावर पाणी सोडावे लागेल.

पायलट यांच्यासमोर असलेला तिसरा पर्याय म्हणजे पक्षाचे सदस्यत्व जाण्याची चिंता न करता वेगळा पक्ष स्थापन करणे. स्वतंत्र पक्ष संघटना स्थापन करून काँग्रेसला आव्हान देण्याचा विचार सचिन पायलट करू शकतात. सध्यातरी याच पर्यायावर सर्वात जास्त विचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. राजस्थानमध्ये सुमारे ३० असे मतदारसंघ आहेत जिथे सचिन पायलट यांचा दबदबा आहे. गुर्जर मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ते आपले उमेदवार निवडून आणू शकतात. तसेच मुस्लिम लोकसंख्या आणि मीणा मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणीसुद्धा ते यशस्वी होऊ शकतात. त्याशिाय राजपूत नेता दीपेंद्र सिंह आणि जाट नेता विश्वेंद्र सिंह हेसुद्धा पायलट यांच्यासोबत आहेत. ते पक्षसंघटनेत आपले योगदान देऊ शकतात.

पायलट यांच्यासमोर असलेला चौथा पर्याय म्हणजे आपल्या सोबत आलेल्या आमदारांना भाजपामध्ये त्यांच्या मानसन्मानाचे रक्षण करण्याचे आश्वासन देऊन सरळ भाजपामध्ये जाणे. मात्र सध्या पायलट यांच्यासोबत अनेक असे नेते आहेत जे भाजपामध्ये जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे सध्या पायलट यांना थेट भाजपामध्ये जाण्यामध्ये अडचणी येत आहेत. हेमाराम चौधरी, दीपेंद्र सिंह, मास्टर भंवरलाल शर्मा हे नेते भाजपात जाण्यास इच्छूक नाहीत. संपूर्ण आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता शेवटच्या निवडणुकीत भाजपामध्ये जाऊन काय करणार असा त्यांचा तर्क आहे. तसेच त्यांना आपल्या राजकीय वारसदारांच्या भविष्याचीही चिंता आहे.

सचिन पायसट यांच्यासमोर असलेला शेवटचा पर्याय म्हणजे कुठल्याही परिस्थितीत गहलोत सरकार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या एकत्रित करणे आणि आपल्या अपमानाचा बदला घेणे. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणे.