शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:00 IST2025-05-13T13:55:29+5:302025-05-13T14:00:42+5:30
PM Narendra Modi at Adampur Aairbase : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे आदमपूर एअरबेसला पोहचून जवानांसोबत संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आभारही मानले.

PM Narendra Modi at Adampur Aairbase : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी(13 मे) पहाटे अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी आपल्या शूर जवानांशी भेटून त्यांचे मनोबल वाढवले आणि एक तासाहून अधिक काळ त्यांच्यासोबत संवादही साधला. यावेळी सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सर्व जवानांनी पंतप्रधान मोदींसमोर 'भारत माता की जय', 'वंदे मातरण'च्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे, आदमपूर एअरबेसवरुन पीएम मोदींनी एका फोटोद्वारे शत्रूला थेट संदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सकाळी 7 वाजता पालमहून हवाई दलाच्या विमानाने आदमपूरला पोहोचले. सुरक्षेच्या कारणास्तव या दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. पीएम मोदी परत दिल्लीला पोहोचल्यानंतर या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले. या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी सैनिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. या दौऱ्यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पीएम मोदींनी एका मिग-29 विमानाच्या प्रतिकृतीसोबत काढलेला फोटो चर्चात आला आहे. या फोटोत विमानाच्या वर एक वाक्य लिहिले आहे. 'शत्रू देशाचे वैमानिक शांतपणे का झोपू शकत नाहीत' असे वाक्य लिहिलेले दिसत आहे. या फोटोत समोर पंतप्रधान मोदी हवाई दलाची टोपी घालून उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, मिग-29 विमानांमुळे शत्रुला शांतपणे झोप लागत नाही.
देशाच्या सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त- या दौऱ्याचे फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, 'आज सकाळी मी आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि शूर हवाई योद्धे आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या सैनिकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. देशासाठी सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा आभारी आहे.'
पंतप्रधान मोदींचा हा दौरा यासाठीही खास आहे, कारण पाकिस्तानी सीमेजवळ असलेला हा एअरबेस उडवल्याचा दावा पाक सैन्याने केला होता. पण, आज खुद्द पंतप्रधान मोदींनी या एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.