पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 09:57 IST2025-05-05T09:47:06+5:302025-05-05T09:57:45+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील आठ आघाडीच्या क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा विनाकारण गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणाव वाढला आहे. गेल्या ११ दिवसापासून पाकिस्तानच्या लष्कराकडून युद्धबंदीचे उल्लंघन सुरू आहे. आज ११ व्या दिवशीही पाकिस्तानकडून उल्लंघन झाले. या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले.
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील आठ आघाडीच्या क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला, यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आणि भारतीय सैन्याला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला असताना, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबाराची ही सलग ११ वी वेळ आहे.
जम्मूमधील संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, ४ आणि ५ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर या भागात नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने तातडीने आणि प्रमाणबद्धपणे प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू क्षेत्रातील पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेस असलेल्या जम्मू, राजौरी आणि पूंछ या पाच सीमावर्ती जिल्ह्यांवर आणि काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांवर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर गोळीबार केला.
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार करण्यात आला, त्यानंतर पाकिस्तानने पूंछ सेक्टरमध्ये आणि नंतर जम्मू प्रदेशातील अखनूर सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन वेगाने वाढवले.
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर, गोळीबार जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील परगवाल सेक्टरपर्यंत सुरू होता.
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार सुरू असताना २९ एप्रिल रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी हॉटलाइनवर चर्चा केल्यानंतरही पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. यादरम्यान, भारताने पाकिस्तानला चकमकीदरम्यान विनाकारण गोळीबार करण्याबाबत इशारा दिला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर काही तासांतच, २४ एप्रिलच्या रात्रीपासून, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील विविध ठिकाणी विनाकारण गोळीबार सुरू केला, याची सुरुवात काश्मीर खोऱ्यापासून झाली.