Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:56 IST2025-05-07T10:45:27+5:302025-05-07T10:56:59+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवस पाकिस्तानला भारी पडले आहेत. सिंधु जल कराराला स्थगिती ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारताच्या १५ बेधडक कारवाईने पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले. सिंधु जल कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानवर पाणी संकट उभे राहिले. त्यानंतर आता एअर स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानची पळता भुई केली आहे.

२२ एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बैसरन खोऱ्यात हल्ला केला. याठिकाणी निष्पाप २६ पर्यटकांना मारण्यात आले. या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्यात अनेक महिलांना विधवा बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवणार अशी शपथ घेतली.

१५ दिवसात १५ कारवाई - भारताने सिंधु जल करार स्थगित केला, या करारामुळे पाकिस्तानवर पाणी संकट आले. सिंधु नदीतून पाकिस्तानच्या १७ कोटी जनतेला पाणी मिळत होते, पाकिस्ताननं याविरोधात यूएनमध्ये जाण्याची तयारी केली होती.

भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी संबंध, करार रद्द केले. पाकिस्तान आणि भारतातील व्यापार रद्द झाल्याने पाकिस्तानला कोट्यवधीचे नुकसान झाले. भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले. त्यामुळे पाकिस्तानातील नद्या कोरड्या झाल्या. भारताने पाकिस्तानवर वॉटर अटॅक केला असं म्हटलं जात होते.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने रणनीती वापरली. त्यात पाकिस्तानला कुठल्याही मोठ्या देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. चीनने समर्थन केले परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची इतर सदस्यांनी कोंडी केली तेव्हा चीनने मौन बाळगले.

भारताने पाकिस्तानच्या सर्व आयात वस्तूंवर बंदी आणली. पाकिस्तानातून भारतात टरबूज, सिमेंट, मिठ, ड्राय फुट्स, दगड, चूना, कापूस, स्टील यासारख्या विविध वस्तू येत होत्या. त्यावर बंदी आली. भारताने पाकिस्तानची डाक सेवाही बंद केली. इतिहासात पहिल्यांदा डाक सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

भारताने पाकिस्तानी जहाजांवर बंदी आणली, पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेतून बांगलादेशला सामान पोहचवत होती. भारताने पाकिस्तानचे सर्व कर्मचारी देशातून बाहेर काढले. भारताच्या या पावलाने पाकिस्तानचा थयथयाट झाला. दोन्ही देशांतील तणाव वाढला.

भारताने पाकिस्तानमध्ये झेलम नदीचे पाणी सोडले, त्यामुळे पाकच्या मुजफ्फराबाद येथे पूरस्थिती निर्माण झाली. संयुक्त राष्ट्रातही भारताने पाकिस्तानला तोंडघशी पाडले. ५ मे रोजी झालेल्या बैठकीत पाकिस्तानला कुठलाही दिलासा मिळाला नाही. उलट सदस्यांनी पाकवर प्रश्नाचा भडिमार केला.

भारताने नवी दिल्लीत सर्व देशांचे राजदूत बोलावले आणि त्यांना पहलगाम हल्ल्यातील पाकच्या नापाक कारवायांची माहिती दिली. त्यामुळे टीव्ही डिबेटपासून बंद खोलीतील बैठकीतही दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर पाकिस्तानला घेरण्यात आले.

भारताने १४ दिवस पाकिस्तानला भय दाखवले. ज्यामुळे पाकच्या मार्केटमधील स्थिती आणखी खराब झाली. तणावामुळे कराची स्टॉक मार्केट सातत्याने खाली कोसळले. यामुळे पाकिस्तानला प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर १५ दिवशी रात्री भारताने स्ट्राईक करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करत उद्ध्वस्त केले.