पगार तर सोडलाच, पण सरकारी भत्तेही नाकारले; लोकसभेच्या या दोन खासदारांचे निर्णय चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:40 IST2026-03-09T19:31:58+5:302026-03-09T19:40:08+5:30
Lok Sabha: सध्याच्या लोकसभेतील केवळ दोन खासदारांनी आपला पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक खासदार भाजपचे आहेत, तर दुसरे काँग्रेसचे आहेत.

लोकसभेतील खासदारांचे पगार आणि भत्ते वाढवण्याबाबत सहसा सर्व पक्ष एकत्र येतात, मात्र सध्याच्या १८ व्या लोकसभेत असे दोन खासदार आहेत ज्यांनी आपला पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती अधिकारातून समोर आलेली ही माहिती सध्या चर्चेचा विषय ठरली असून, हे दोन खासदार भाजप आणि काँग्रेस या दोन परस्परविरोधी पक्षांचे आहेत. या दोन खासदारांच्या संपत्तीत मोठी तफावत असूनही त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यांनी आपला पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ पगारच नाही, तर सरकारकडून मिळणारे भत्ते आणि इतर सोयी-सुविधा घेण्यासही नकार दिला आहे.

जिंदाल हे १८ व्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक असून, त्यांच्याकडे १,२४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

डॉ. बिमोल अकोइजम अंगोमचा (काँग्रेस, इनर मणिपूर): मणिपूरचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. बिमोल यांनीही लोकसभेचा पगार न घेण्याचे जाहीर केले आहे.

डॉ. बिमोल अकोइजम यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती सुमारे ९७ लाख रुपये इतकी आहे.

तेलुगु देसम पार्टीचे गुंटूरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे ५,७०५ कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी (४,५६८ कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो.

















