"देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की...", NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:23 PM2022-07-30T18:23:26+5:302022-07-30T18:29:39+5:30

देशात काही लोक असे आहेत की जे असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यातून देशाच्या विकासात खोडा घातला जाऊ शकतो, असं विधान देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज दिल्लीत सूफी धर्मगुरूंसोबत आयोजित आंतरधर्मीय परिषदेत सहभागी झाले होते. यात बोलताना त्यांनी महत्वाचं विधान केलं.

"धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली कटुता आणि संघर्ष निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. यामुळे संपूर्ण देशावर परिणाम होत आहे आणि देशाबाहेरही याचे परिणाम होतात", असं अजित डोवाल म्हणाले.

"जगात संघर्षाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्या वातावरणाचा सामना करायचा असेल तर सर्वांनी मिळून देशाची एकात्मता टिकवून मजबूत देशाप्रमाणे पुढे जाणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून देश जी प्रगती करत आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला फायदा होईल", असं डोवाल म्हणाले.

"जे काही लोक धर्म किंवा विचारसरणीच्या नावाखाली लोकांमध्ये हिंसाचार किंवा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होतो. देशांतर्गत तसेच देशाबाहेरही याचे परिणाम होतात", असंही ते म्हणाले.

NSA अजित डोवाल म्हणाले की, कट्टरतावाद्यांविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे. मूक प्रेक्षक बनण्याऐवजी आम्हाला आमचा आवाज मजबूत करण्यासाठी तसेच आमच्यातील मतभेद दूर करण्यासाठी तळागाळात काम केले पाहिजे.

आपण भारतातील प्रत्येक पंथाला जाणीव करून दिली पाहिजे की आपण एकत्र एक देश आहोत, त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि प्रत्येक धर्माला आपल्या स्वातंत्र्यासह येथे राहण्याचा अधिकार आहे, असं डोवाल म्हणाले.

परिषदेत उपस्थित असलेले हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांनी कट्टरपंथी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, 'कोणत्याही घटनेचा आम्ही निषेध करतो. ही वेळ निंदा करण्याची नाही तर काहीतरी करण्याची आहे. देशात पसरलेल्या सर्व कट्टरवादी संघटनांवर बंदी घातली पाहिजे. कोणतीही कट्टरपंथी संघटना असो, त्यांच्याविरुद्ध पुरावे असल्यास त्यांच्यावर बंदी घालावी.

देशात काही लोक असे आहेत की जे असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यातून देशाच्या विकासात खोडा घातला जाऊ शकतो. पण अशा लोकांना आपण एक देश म्हणून एक आहोत हे दाखवून दिलं पाहिजे, असं अजित डोवाल म्हणाले.