Omicron Variant : बापरे! कोरोना लस घेतलेल्या 90% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 09:06 AM2021-12-20T09:06:40+5:302021-12-20T09:32:26+5:30

Omicron Variant CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 3 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढवली आहे. जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे.

भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी तब्बव 90% लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर ब्रिटनमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. पण यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल.

जगातील बहुतांश देशांमध्ये या दोन्ही लसी उपलब्ध नाहीत. भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लसीने सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही.

भारतात लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना AstraZeneca लस Covishield या नावाखाली मिळाली आहे. या लसीचे 65 दशलक्षाहून अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये वितरित केले गेले आहेत.

प्राथमिक संशोधनानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन, रशिया आणि चीनमध्ये बनवलेल्या लसी देखील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कुचकामी किंवा खूपच कमी सक्षम असल्याचं आढळलं आहे.

जगातील बहुतेक देशांची लसीकरण मोहीम या लसींवर आधारित असल्याने महामारीच्या नवीन लाटेचा प्रभाव व्यापक असू शकतो. जगातील कोट्यवधी लोकांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढल्यानं नवीन व्हेरिएंट उदयास येण्याचा धोका वाढतो.

जे मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीची पूर्ण दखल घेत नाहीत. हे संशोधन जगातील लोकांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित नाही, पण तरीही त्याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिल्लीत सार्वजनिक आरोग्य संशोधक म्हणून काम करणारे रमणन लक्ष्मीनारायणन म्हणतात की, ओमायक्रॉन संसर्ग भारतात वेगाने वाढेल. मात्र लसीकरणामुळे आणि पूर्वी संसर्ग झालेल्या मोठ्या संख्येनं भारत सुरक्षित राहील अशी आशा आहे.

लक्ष्मीनारायण यांनी भारतात सरकार बूस्टर डोसचा विचार करत आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून अजूनही खूप धोका आहे. सरकार उर्वरित लोकसंख्येला लसीकरण, किंवा बहुतेकांसाठी दोन डोस, आणि वृद्धांना, उच्च धोका असलेल्यांना बूस्टर डोस देण्याच्या कल्पनेवर विचार करत आहे असं म्हटलं आहे.

ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती देखील त्यांनी यावेळी सांगितली.

डॉ. व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे. निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो असं म्हटलं आहे.

"जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या कोरोनाचा आवाका पाहिला आणि तसाच रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला, तर देशात दिवसाला तब्बल 14 लाख कोरोना रुग्ण सापडतील" असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

"ओमायक्रॉन घातक ठरत असल्याची अद्याप ठोस आकडेवारी हाती आलेली नसली तरी अजूनही हा प्रकार पूर्णपणे समजायचा आहे. त्यामुळेच अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे."

"ओमायक्रॉनची सौम्य लक्षणं जाणवतात मात्र हा अत्यंत वेगाने पसरत आहे" असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे. आफ्रिका आणि युरोप प्रमाणे जर कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड मोडला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होईल.